जिल्ह्यात एक हजार नागरिकांमागे फक्त एक पोलीस कर्मचारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:10 IST2021-02-05T06:10:18+5:302021-02-05T06:10:18+5:30
नांदेड : सदरक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीद घेऊन अहोरात्र डोळ्यात तेल घालून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलीस दलावर दिवसेंदिवस ताण ...

जिल्ह्यात एक हजार नागरिकांमागे फक्त एक पोलीस कर्मचारी
नांदेड : सदरक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीद घेऊन अहोरात्र डोळ्यात तेल घालून नागरिकांची सुरक्षा करणाऱ्या पोलीस दलावर दिवसेंदिवस ताण वाढतच चालला आहे. ३६ लाख लोकसंख्येच्या नांदेड जिल्ह्यात आजघडीला केवळ साडेतीन हजार पोलीस कर्मचारी आहेत. त्यामुळे १ हजार २८ नागरिकांमागे एक पोलीस कर्मचारी असे प्रमाण आहे. येत्या पोलीस भरती प्रक्रियेत जिल्ह्यात कर्मचाऱ्यांच्या अधिक जागा भरण्याची गरज आहे.
जिल्ह्यात सध्या ३६ पोलीस ठाणी आहेत. त्यातही माहूर, किनवट असे दुर्गम तालुकेही आहेत. तर जिल्ह्याच्या सीमा शेजारील विदर्भ आणि तेलंगणाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी गुन्हेगारीचे प्रमाण जास्त आहे. अशा परिस्थितीत पोलीस दलाला अधिक सक्षम करण्याची गरज आहे. त्यासाठी पुरेशा प्रमाणात मनुष्यबळाची गरज आहे. यापूर्वी चंद्रकिशोर मीणा यांच्या काळात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती.
राज्यातील जवळपास प्रत्येक जिल्ह्यात हजार नागरिकांमध्ये एक पोलीस कर्मचारी आहे. त्यातही बंदोबस्तासाठीच अधिक वेळ जात असल्याने गुन्ह्यांचा तपास रखडतो. नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांत लूटमारी, खंडणी, चोरीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे अतिरिक्त कर्मचारी मिळाल्यास पोलीस दलाला बुस्टर मिळेल. परंतु दरवर्षी होणारी भरती पाहता, या वेळी जिल्ह्याला पुरेसे मनुष्यबळ मिळण्याची अपेक्षा कमीच आहे.
नांदेड जिल्हा संवेदनशील आहे. या ठिकाणी किरकोळ कारणावरून मोठ्या घटना घडतात. त्यामुळे पोलिसांना सारखे बंदोबस्तावर राहावे लागते. रात्रीची गस्त, सण-उत्सव, मंत्र्यांचे दौरे यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांवरील ताण वाढतच चालला आहे. त्यामुळे अनेक पोलिसांना मधुमेह, ब्लडप्रेशर यासारख्या समस्यांनी ग्रासले आहे. कर्तव्य बजाविताना कुटुंबाकडेही पुरेसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे मानसिक स्वास्थ्य बिघडते.