नांदेड शहरात वन-वे नावालाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:12 IST2021-02-22T04:12:43+5:302021-02-22T04:12:43+5:30
नांदेड : शहरात नेदलँडच्या धर्तीवर असलेले रस्ते अगोदरच अरुंद पडत आहेत. त्यात वाहतुकीला शिस्त असावी म्हणून काही मार्गांवर एकेरी ...

नांदेड शहरात वन-वे नावालाच
नांदेड : शहरात नेदलँडच्या धर्तीवर असलेले रस्ते अगोदरच अरुंद पडत आहेत. त्यात वाहतुकीला शिस्त असावी म्हणून काही मार्गांवर एकेरी वाहतूक करण्यात आली आहे; परंतु नांदेडकरांना मात्र एकेरी मार्गाशी काही एक देणे-घेणे नसल्याचेच दिसून येते. सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करून एकेरी मार्गावरून विरुद्ध दिशेने वाहने दामटविण्यात येतात. चिखलवाडी, वजिराबाद, जुना मोंढा या प्रमुख रस्त्यांवर दररोज अशाच प्रकारचे चित्र पाहावयास मिळते. त्यामुळे या रस्त्यावर दररोज वाहतुकीची कोंडी होते. विशेष म्हणजे अशा वाहनधारकांवर पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही.
वाहतूक नियमांना खो
शहरात वाहतुकीचे नियम पाळणाऱ्यांची संख्या अत्यंत कमी आहे. संधी मिळताच सिग्नल तोडणे हा तर अनेकांचा छंदच झाला आहे. झेब्रा क्राॅसिंगकडेही दुर्लक्ष करण्यात येते. त्याचबरोबर एकेरी मार्गावरून सर्रासपणे दुहेरी वाहतूक करण्यात येत असल्याचे दिसून येते.
वाहतूक पोलीस गायब?
शहरात वाहतूक सुरळीत करण्यासाठी कर्मचारी आहेत; परंतु रस्ते आणि वाहनांची संख्या लक्षात घेता त्यांच्यावर अधिक ताण पडतो. अनेक महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक शाखेचा कर्मचारीच नसतो. त्यामुळे वाहनधारक बेशिस्तपणे वाहन चालवितात.
रस्त्यांवरच होेते पार्किंग
शहरातील जवळपास सर्वच बाजारपेठांमध्ये पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था नाही. त्यामुळे मुख्य रस्त्यावरच वाहने उभी केली जातात. दुचाकी, चारचाकीमुळे जवळपास अर्धा रस्ता व्यापला जातो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. अशा वाहनधारकांवर कारवाई होत नाही.
शहरात चिखलवाडी, जुना मोंढा, वजिराबाद हे प्रमुख रस्ते एकमार्गी आहेत. या रस्त्यावरच शहराची मुख्य बाजारपेठ आहे; परंतु या एकेरी मार्गावरही दोन्ही बाजूंनी वाहने धावत असतात. त्यामुळे अनेक वेळेला अपघाताच्या घटना घडतात. वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांकडून अशा पद्धतीने नियम तोडणाऱ्यांच्या विरोधात मात्र कारवाई करण्यात येत नाही. कारवाईसाठी समोर पोलीस कर्मचारी दिसताच वाहनधारक शेजारील गल्लीबोळांतून आपले वाहने वळवतात. त्यामुळे ते पोलिसांच्या लागत नाहीत. त्यामुळे अशा एकेरी मार्गावर पोलीस कर्मचारी नियुक्त करून अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई होण्याची गरज आहे. शहर वाहतूक शाखेने आता नियम तोडणाऱ्या वाहनधारकांच्या विरोधात मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत अनेक वाहने जप्त करण्यात आली आहेत.