एक व्यक्ती, एक रुपये, एक भजे...शेकडो गिऱ्हाईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:13 IST2020-12-27T04:13:40+5:302020-12-27T04:13:40+5:30
उमरी : आजकाल हाताला काम नाही म्हणून बोंब उठवली जाते. बेकारांचे बेकार टोळके रस्त्याने रिकामे हिंडताना दिसतातही. परंतु ...

एक व्यक्ती, एक रुपये, एक भजे...शेकडो गिऱ्हाईक
उमरी : आजकाल हाताला काम नाही म्हणून बोंब उठवली जाते. बेकारांचे बेकार टोळके रस्त्याने रिकामे हिंडताना दिसतातही. परंतु जिद्द, चिकाटी, परिश्रमाची तयारी असल्यास कमी भांडवलात, कमी मनुष्यबळावरही नगदी कमाई होऊ शकते. याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे उमरी शहरातील गोरठा पॉईंट येथील मिरची भजे विक्रेते असलेले शेख अजिज भाई हे ठेला चालक!
दहा रुपयांत दहा भजे अर्थात केवळ एक रुपयांस एक... अशी साधी सोप्पी क्लृप्ती वापरून मागील अनेक वर्षांपासून हे ठेला चालक व्यवसाय करतात. साठीच्या आसपासचे वयोमान. सकाळपासून ते रात्रीपर्यंत गिऱ्हाईक हटता हटेना. हातावर पोट असणारे, छोटे मोठे व्यावसायिक, बाजारास आलेले ग्रामीण लोक यांच्यासोबतच शहरातील कर्मचारी व वास्तव्यास असणारे लोक आवडीने हे भजे खातात. जास्त करून तर पार्सलचे ग्राहक आहेत. दहा रुपयांत पोट व मन भरेल असे हे भजे व्यवसायाचा उत्कृष्ट नमुना असल्याचे प्रत्यक्षात पहावयास मिळते.
समाज कल्याणच्या छोटेखानी टपरित या भज्यांचा घमघमाट सुटलेला आहे. मालक आणि नोकर एकच व्यक्ती आहे. गिऱ्हाईक जास्तीची असल्याने एक मदतनीस फक्त पार्सल देण्यासाठी ठेवलेला आहे. विशेष म्हणजे यासाठी साफसफाई स्वच्छता सुद्धा चांगलीच जपली जाते. उद्योगधंद्याच्या शोधात, कर्जासाठी बँकेकडे खेटे घालीत फिरण्यापेक्षा कमीत कमी भांडवलात चांगला व्यवसाय आपण करू शकतो आणि तेही नगदी स्वरूपात कमाई होते. हे एक चांगले उदाहरण ठरले आहे. इतर अनेक बेरोजगार तरुणांना प्रेरणा देणारी ही बाब होय.