५०० कोटींचे कर्ज मंजूर करतो म्हणून एक कोटीला गंडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 17:12 IST2020-02-14T17:10:07+5:302020-02-14T17:12:49+5:30
याप्रकरणी भुवनेश्वर येथून देवेंद्र शहा याला अटक करण्यात आली आहे.

५०० कोटींचे कर्ज मंजूर करतो म्हणून एक कोटीला गंडविले
नांदेड : व्यवसायासाठी ५०० कोटींचे कर्ज मंजूर करुन घेण्यासाठी १ कोटी रुपयांना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आला असून वजिराबाद ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भुवनेश्वर येथून देवेंद्र शहा याला अटक करण्यात आली आहे. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करीत आहे.
लोहा तालुक्यातील जानापुरी येथील राजाराम मारोतराव येवले यांनी १ जानेवारी २०१३ ते ३१ डिसेंबर २०१९ या कालावधीत यांची लॉजीस्टिक अॅन्ड स्टोरेज या व्यवसायासाठी ५०० कोटी रुपये कर्ज मंजूर करुन देण्यासाठी मुंबई येथील अरुण भुतडे व अमित मेहत्रे या दोघांनी कोलकाता येथील राजकुमार रंजित घोष यांच्याशी ओळख करुन दिली. या ओळखीनंतर कोलकाता येथील सी.ए. सोमनाथ शील याच्या मध्यस्थीने येवले यांना व्यवसायासाठी कर्ज मंजूर करण्यासाठी १ कोटी रुपये मागितले. त्यापैकी २७ लाख रुपये आरटीजीएसद्वारे तर ७३ लाख रुपये हे रोख स्वरूपात देण्यात आले. १ कोटी रुपये घेऊनही येवले यांना कर्ज मंजूर न करता त्यांची फसवणूक करण्यात आली.
या प्रकरणी येवले यांच्या तक्रारीवरुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात कोलकता येथील देवेंद्र जगदीश शहा याला १० फेब्रुवारी रोजी भुवनेश्वर येथून अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर, अप्पर पोलीस अधीक्षक दत्तराम राठोड, विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुभान केंद्रे, पोहेकॉ त्र्यंबक भोसकर, बालाजी पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहा याला १३ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.