बसस्थानकात ना रॅम्प ना व्हील चेअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:53+5:302021-02-05T06:09:53+5:30
चौकट व्हीलचेअरसाठी पुढाकार गरजेचा नांदेड मध्यवर्ती बसस्थानकात ज्येष्ठ, अपंग व्यक्तींसाठी व्हील चेअरची व्यवस्था नाही. काही शहरांच्या बसस्थानकात समाजकल्याण विभागाच्यावतीने ...

बसस्थानकात ना रॅम्प ना व्हील चेअर
चौकट
व्हीलचेअरसाठी पुढाकार गरजेचा
नांदेड मध्यवर्ती बसस्थानकात ज्येष्ठ, अपंग व्यक्तींसाठी व्हील चेअरची व्यवस्था नाही. काही शहरांच्या बसस्थानकात समाजकल्याण विभागाच्यावतीने व्हीलचेअर पुरविण्यात आलेल्या आहेत तसेच बसस्थानकात जाण्यासाठी व्हील चेअरसाठी स्वतंत्र रॅम्पही तयार करण्यात आलेले आहेत. परंतु, नांदेड बसस्थानकात व्हील चेअरही नाहीत आणि रॅम्पही नाही.
बसस्थानकात रॅम्पच नाही
बसस्थानकात येणाऱ्या ज्येष्ठ दिव्यांगासाठी त्यांची व्हीलचेअर बसस्थानकातील वेटिंग रूमपर्यंत जावी यासाठी चोहोबाजूने असणाऱ्या प्रवेशद्वारांच्या बाजूला रॅम्प असणे गरजेचे आहे.परंतु, नांदेड स्थानकात मुख्य प्रवेशद्वारावर पायऱ्या आहेत परंतु, तिथे कुठेही रॅम्प नाही अथवा ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र वेटिंग रूमही नाही.
ज्येष्ठांची अवहेलना थांबवा
नांदेड बसस्थानकात व्हीलचेअर अथवा स्वतंत्र वेटिंग रूम नसल्याने ज्येष्ठांसह दिव्यांग व्यक्तींना सामान्य प्रवाशांमध्येच बसावे लागते. अनेकवेळा बसस्थानकांत गर्दी असते. त्यात कुठेही जागा उपलब्ध होत नाही. अथवा कोणीही प्रवासी उठत नाही. त्यामुळे त्यांना उभे राहावे लागते. या बाबी थांबविण्यासाठी नियमांचे काटेकाेरपणे पालन होणे गरजेचे आहे.
बालासाहेब येगावकर, ज्येष्ठ नागरिक
ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांगासाठी बसमध्ये आसन व्यवस्था राखीव असते. त्यामुळे त्यांच्या जागेवर इतर कोणी प्रवाशी बसलेला असेल तर त्यास उठवून ज्येष्ठ, दिव्यांगांना सन्मानाने त्या जागेवर बसविणे गरजेचे आहे. ही वाहकांची ड्युटी आहे. परंतु, असे होताना दिसत नाही. अनेकवेळा ज्येष्ठ उभे असतात तर युवक बसलेले असतात. हे थांबविणे गरजेचे आहे.
पंजाबराव कल्याणकर, ज्येष्ठ नागरिक
नांदेड बसस्थानकात व्हीलचेअर उपलब्ध नाहीत. परंतु, येणाऱ्या काळात बसस्थानक दुरुस्तीचा प्रस्ताव असून त्यावेळी आवश्यक त्या ठिकाणी रॅम्प बनविण्यात येतील. त्याचबरोबर समाजकल्याण विभाग अथवा इतर सामाजिक संस्थेच्या मदतीने व्हीलचेअर उपलब्ध करून देऊ. बसमध्ये असणाऱ्या राखीव जागेवर शक्यतो त्याच व्यक्तीस बसविण्याचा वाहक आग्रह धरतात. - वर्षा येरेकर, बसस्थानक प्रमुख, नांदेड