लॉकडाऊनमुळे मिळाले नाही नवे काम; नैराश्यातून नवोदित कलाकाराने संपवला जीवनप्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 20:29 IST2020-07-29T20:26:13+5:302020-07-29T20:29:07+5:30
दुपारी घरी कोणी नसताना आशुतोष भाकरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़

लॉकडाऊनमुळे मिळाले नाही नवे काम; नैराश्यातून नवोदित कलाकाराने संपवला जीवनप्रवास
नांदेड : नांदेडातील नवोदित कलाकार आशुतोष भाकरे (३२) यांनी बुधवारी दुपारी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली़ लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांपासून कोणतेही नवीन काम मिळाले नाही़ त्यामुळे ते निराश झाले होते़ अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली़
शहरातील गणेशनगर भागात पंचमुखी हनुमान मंदिराजवळ भाकरे यांचे निवासस्थान आहे़ बुधवारी दुपारी घरी कोणी नसताना आशुतोष यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली़ सायंकाळी चार वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आली़ त्यांनी ‘विचार ठरला पक्का’, ‘भाकर’ यासारख्या चित्रपटांत काम केले आहे़ तसेच ‘जून जुलै’ या नाटकाचे ते निर्माते होते़ यासह काही शॉर्ट फिल्ममध्येही त्यांनी काम केले होते़ त्यांची पत्नी मयूर भाकरे यांनी अनेक गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत़
दरम्यान, लॉकडाऊनमुळे गेल्या चार महिन्यांपासून काम बंद आहे़ नवीन काम तूर्त मिळण्याची अपेक्षाही नाही़ त्यामुळे आशुतोष हा निराश झाला होता़ अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली़ शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून प्रेत उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले़ या प्रकरणात पोलिस दप्तरी कुठलीही नोंद करण्यात आली नव्हती़