नांदेड जिल्हा परिषदेच्या १ हजार शाळा अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 13:34 IST2019-07-26T13:33:20+5:302019-07-26T13:34:56+5:30

मूलभूत सुविधांची वानवा 

Nanded Zilla Parishad has 3,000 schools in the dark | नांदेड जिल्हा परिषदेच्या १ हजार शाळा अंधारात

नांदेड जिल्हा परिषदेच्या १ हजार शाळा अंधारात

ठळक मुद्देशाळांकडे २९ लाख रुपयांचे बिल थकलेविजेअभावी डिजिटलायझेशन वाऱ्यावर

नांदेड : जिल्ह्यातील जि़प़ च्या तब्बल १ हजार १९ शाळांचा विद्युत पुरवठा बंद असल्याने या शाळा अंधारात आहेत़ यातील ६२२ शाळांना अद्याप वीजजोडणीच करण्यात आली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. 

जिल्ह्यात सोळा तालुक्यात २ हजार २६३ शाळा आहेत़ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या शाळा हाच पर्याय आहे़ सर्व शिक्षा अभियानांतर्गत  शाळा विकासासाठी लाखोंचा निधी देण्यात येतो़ मात्र काही शाळांना हा निधी उपलब्ध होत नसल्याने संबंधित शाळा प्रशासन विद्युत बिल भरत नाहीत़ यामुळे शाळेतील विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. अनेक शाळेतील संगणक कक्षात धूळ साचली आहे़   जिल्हा परिषदेच्या वाडी, वस्ती, तांड्यावरील ६२२ शाळेत विज जोडणी झाली नाही़ तर ३९७ शाळांनी विद्युत बिल भरले नाही़ या शाळांकडे जवळपास २८ लाख ९५ हजार रूपये वीज बिल थकले आहे.

सुविधांअभावी कुचंबणा
 खाजगी शाळांच्या स्पर्धेत उतरत असताना जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांना मूलभूत सुविधांचीही पूर्तता करता येत नसल्याचे चित्र आहे़ अनेक शाळेत स्वच्छतागृह नसल्याने विद्यार्थ्यांची कुचंबणा होत आहे़ विशेषता १२३ शाळेत  विद्यार्थिंनीसाठी स्वच्छतागृह नाही.या कारणामुळे  मुली शिक्षणापासून दूर राहत आहेत़ 

विजेअभावी डिजिटलायझेशन वाऱ्यावर
जिल्हा परिषद शाळांचे डिजिटलायझेशन होत असल्याची चर्चा होत असताना अनेक शाळेत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, क्रीडांगण, विद्युत पुरवठा नसल्याचे सिद्ध झाले आहे़ त्यामुळे डिजिटल शाळांच्या वाटेत मोठा अडथळा निर्माण होत आहे़ जिल्ह्यात ज्या शाळा डिजिटल झाल्या आहेत तेथे वीजच नसल्याने डिजिटलायझेशन वाऱ्यावर आहे.

शासनाने शाळांचे थकीत बिल माफ करावे, अशी मागणी करण्यात आली होती़ शासन निर्णयानुसार शाळांना जो विद्युत पुरवठा केला जातो त्याचे व्यावसायिक दराने बिल न अकारता घरगुती दराने बिल आकारणे गरजेचे आहे़ ज्या शाळेत वीज नाही, त्या ठिकाणी शालेय समितीने पाठपुरावा करून शाळेला विद्युत जोडणी करून घेणे आवश्यक आहे़ 
- व्यंकटेश चौधरी, शिक्षण विस्तार अधिकारी़ 

Web Title: Nanded Zilla Parishad has 3,000 schools in the dark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.