-मारोती चिलपिपरे
कंधार (नांदेड): गरिबांना वितरित करण्यासाठी असलेले स्वस्त धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याचा धक्कादायक प्रकार नांदेड जिल्ह्यातील कंधार येथे उघडकीस आला आहे. नांदेड-बीदर राष्ट्रीय महामार्गावरील फुलवळ टोलनाक्याजवळ आज पहाटे दोन वाजेच्या सुमारास तांदळाचे पोते भरलेला ट्रक डिव्हायडरला धडकून उलटला. या घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून, या प्रकारामुळे रेशन माफियांचे रॅकेट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
आज पहाटे सुमारे २ वाजताच्या सुमारास कंधारमधील फुलवळ टोलनाक्याजवळ एका १४ चाकी ट्रकचा (क्रमांक पी.बी. ०४ ए.एफ. ८४४८) अपघात झाला. हा ट्रक डिव्हाडरला धडकल्यामुळे पलटी झाला आणि त्यामधील सुमारे ६५० तांदळाची पोती रस्त्यावर अस्ताव्यस्त पडली. या अपघातानंतर ट्रकचा चालक तात्काळ घटनास्थळावरून पळून गेला. या तांदळाच्या पोत्यांवर शासकीय चिन्हे असल्याने, हा गरिबांना मिळणारा रेशनचा तांदूळ असल्याची माहिती समोर आली. यामुळे स्थानिक नागरिक आणि उपस्थितांनी संताप व्यक्त केला. घटनास्थळी उशिराने पोहोचलेल्या महसूल व पोलीस प्रशासनावरही नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. या प्रकरणात मोठ्या राजकीय व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शिवसेना (उबाठा) उप जिल्हाप्रमुखांचा गंभीर आरोपया सर्व प्रकारावर शिवसेनेचे (उबाठा) उपजिल्हाप्रमुख भालचंद्र बापूसाहेब नाईक यांनी गंभीर आरोप केला आहे. हा रेशनचा तांदूळ मुखेड तालुक्यातील पुरवठा ठेकेदाराकडून येत होता. माहिती मिळताच आमच्या कार्यकर्त्यांनी रात्री या ट्रकचा पाठलाग केला होता. मात्र, ट्रकने वेग वाढवल्याने हा अपघात झाल्याचे त्यांनी सांगितले. नाईक यांनी या प्रकरणाची लेखी तक्रार उपविभागीय कार्यालयात करणार असल्याचे सांगितले असून, जर पोलीस आणि महसूल विभागाने तात्काळ कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे.