...अन् पाच मिनिटे थांबले नांदेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 12:24 AM2018-12-06T00:24:41+5:302018-12-06T00:27:30+5:30

मृत्यूनंतर आपले अवयव इतरांच्या कामी यावेत यासाठी अवयवदानाची चळवळ सुरु करण्यात आली़ या चळवळीला नांदेडकरांनी सुरुवातीपासूनच भरभरुन प्रतिसाद दिला आहे़

Nanded stopped for five minutes | ...अन् पाच मिनिटे थांबले नांदेड

...अन् पाच मिनिटे थांबले नांदेड

Next
ठळक मुद्देचौथ्यांदा ग्रीन कॉरिडोर पहिल्यांदाच होणार किडनी प्रत्यारोपणही

नांदेड : मृत्यूनंतर आपले अवयव इतरांच्या कामी यावेत यासाठी अवयवदानाची चळवळ सुरु करण्यात आली़ या चळवळीला नांदेडकरांनी सुरुवातीपासूनच भरभरुन प्रतिसाद दिला आहे़ नांदेडातील हजारो जणांनी अवयवदानासाठी नोंदणीही केली आहे़ त्यात गेल्या वर्षभराच्या काळात नांदेडात सलग चौथ्यांदा ग्रीन कॉरिडोर करण्यात आला़ बुधवारी हृदय घेवून निघालेल्या रुग्णवाहिकेसाठी ५ मिनिटे १२ सेकंद शहर जागेवरच थांबले होते़ नांदेडकरांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून ताफ्यातील डॉक्टर आणि पोलीस कर्मचाऱ्यांनीही कौतुक केले़
विष्णूपुरीतील शासकीय रुग्णालयातून सर्वात प्रथम सुधीर रावळकर या युवकाच्या अवयवदानासाठी ग्रीन कॉरिडोर करण्यात आला़ शासकीय रुग्णालय ते विमानतळ असे जवळपास पंधरा किमींचे अंतर अवघ्या १२ मिनिटांत पूर्ण करण्यात आले होते़ त्यामुळे डॉक्टरांसह प्रशासनाचा आत्मविश्वासही वाढला होता़ त्यानंतर आठच दिवसांत याच ठिकाणाहून आणखी एक ग्रीन कॉरिडोर करण्यात आला़ त्यानंतर काही महिन्यांपूर्वीच ग्लोबल हॉस्पिटलमधून तिसरा ग्रीन कॉरिडोर करण्यात आला़
बुधवारी नांदेडात चौथ्यांदा ग्रीन कॉरिडोर यशस्वीरित्या पार पडले़ त्यासाठी अख्खी यंत्रणा मंगळवारी रात्रीपासून कामाला लागली होती़ शहर वाहतूक शाखेचे पोनि़चंद्रशेखर कदम यांच्यासह त्यांची सर्व टीम पहाटेपासूनच रस्त्यावर उतरली होती़
ग्लोबल हॉस्पिटल ते विमानतळाकडे जाणा-या रस्त्यावर पावला-पावलावर कर्मचाºयांना तैनात करण्यात आले होते़ शिवाजीनगर, भाग्यनगर, विमानतळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकही आपल्या कर्मचा-यांसह रस्त्यावर उभे होते़ दुपारी बारा वाजेच्या सुमारास ग्रीन कॉरिडोरची तयारी अंतिम टप्प्यात येताच विमानतळाकडे जाणाºया रस्त्यावरील सर्व वाहतूक थांबविण्यात आली होती़ अंतर्गत रस्त्यावर कर्मचारी तैनात करुन वाहतूक थांबविण्यात आली होती़
१२ वाजून २९ मिनिटांनी ग्लोबलमधून ताशी १०० किमीच्या गतीने निघालेली रुग्णवाहिका अवघे ५ मिनिटे १२ सेकंदात विमानतळावर पोहोचली़ ही पाच मिनिटे जणू नांदेड शहर जागेवरच थांबले होते़ रुग्णवाहिकेच्या मार्गात कुठे अडथळा निर्माण होवू नये यासाठी नांदेडकर स्वत: खबरदारी घेत होते़ त्यानंतर विमानाने हृदय मुंबईला पाठविण्यात आले़
विमानात हृदय पोहोचविताच या पथकातील डॉक्टर आणि पोलीस कर्मचाºयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ कॉरिडोर यशस्वी झाल्याचे समाधान त्यांच्या चेहºयावर दिसत होते़ त्यानंतर काही वेळातच रुग्णवाहिकेने किडनी आणि यकृत औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात पाठविण्यात आले़ ही रुग्णवाहिका शहराबाहेर जाईपर्यंत वाहतूक रोखली होती़ ग्रीन कॉरिडोरसाठी नांदेडकरांनी दाखविलेल्या उत्साहाचे डॉक्टर आणि पथकातील कर्मचाºयांनीही कौतुक केले़ रस्त्यावर दोन्ही बाजूंनी शहरवासियांनी मोठी गर्दी केली होती़

ग्रीन कॉरिडोरला नांदेडकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नांदेडकर जनतेने या ग्रीन कॉरिडोरसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाग़्लोबल हॉस्पिटल ते विमानतळापर्यंतच्या रस्त्यावर नागरिक स्वत:हून रुग्णवाहिकेला अडथळा निर्माण होवू नये याची काळजी घेत होते़ आॅटोचालकही स्वत: रस्ता मोकळा करण्यासाठी मदत करीत होते़ जो-तो आपापल्या परिने या ग्रीन कॉरिडोरसाठी योगदान देत होता़ याचे कौतुक करावे तेवढे कमी असल्याची प्रतिक्रिया शहर वाहतूक शाखेचे पोनि़चंद्रशेखर कदम यांनी दिली़
तिसºया ग्रीन कॉरिडोरच्या वेळी वेगाने असलेल्या रुग्णवाहिकेसमोर अचानक एक जनावर आले होते़ यावेळी चालकाने प्रसंगावधान राखत जनावराला चुकविले होते़ त्यामुळे यावेळी जनावरे रस्त्यावर येवू नयेत यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली होती़ रस्त्याच्या कडेला असलेल्या जनावरांना कॉरिडोर सुरु होण्यापूर्वीच पिटाळून लावण्यात आले होते़ त्यामुळे जनावरांचा अडथळा निर्माण झाला नाही़

  1. सकाळी नऊ वाजेपासूनच रुग्णालयात शस्त्रक्रियेची तयारी
  2. शहर वाहतूक शाखा अन् पोलीस कर्मचारीही उतरले रस्त्यावर
  3. दुपारी बारा वाजता शस्त्रक्रिया पूर्ण होताच पोलिसांना माहिती
  4. पोलिसांनी लगेच रुग्णालय ते विमानतळ जाणाºया रस्त्यावरील वाहतूक अडविली
  5. दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी ग्रीन कॉरिडोरला सुरुवात
  6. १२ वाजून ३४ मिनिटे १२ सेकंदात हृदय घेवून निघालेली रुग्णवाहिका विमानतळावर
  7. हृदय विमानात ठेवल्यानंतर दहा मिनिटांत विमान मुंबईसाठी हवेत

Web Title: Nanded stopped for five minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.