नांदेडच्या पासपोर्ट सेवा केंद्रात तीन दिवसांत झाली ५७ जणांच्या कागदपत्रांची पडताळणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:47 IST2018-04-10T19:47:10+5:302018-04-10T19:47:10+5:30
नांदेड येथील डाकघर कार्यालयात सुरू करण्यात आलेले पासपोर्ट सेवा केंद्र शनिवारी कार्यान्वित करण्यात आले आहे़ तीन दिवसांत जवळपास ५७ जणांच्या कागदपत्रांची या ठिकाणी पडताळणी करण्यात आली आहे़

नांदेडच्या पासपोर्ट सेवा केंद्रात तीन दिवसांत झाली ५७ जणांच्या कागदपत्रांची पडताळणी
नांदेड : नांदेड येथील डाकघर कार्यालयात सुरू करण्यात आलेले पासपोर्ट सेवा केंद्र शनिवारी कार्यान्वित करण्यात आले आहे़ तीन दिवसांत जवळपास ५७ जणांच्या कागदपत्रांची या ठिकाणी पडताळणी करण्यात आली आहे़ दिवसेंदिवस प्रतिसाद वाढत असून नांदेडसह परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील नागरिकांचा पासपोर्ट काढणाऱ्यांमध्ये समावेश आहे़
नांदेड येथील पासपोर्ट सेवा केंद्र सुरू झाल्यामुळे विदेशात जाणाऱ्या नागरिकांच्या पासपोर्ट काढण्यासाठी पुणे अथवा नागपूर येथे होणाऱ्या चकरा बंद झाल्या आहेत़ शनिवारपासून सदर कार्यालय नांदेडात कार्यान्वित झाले आहे़ दरम्यान, आॅनलाईन नोंदणी केलेल्या जवळपास ५७ जणांची या ठिकाणी पडताळणी करण्यात आली़ पुढील महिनाभरात त्यांना पासपोर्ट मिळेल़
यामध्ये शिक्षणासाठी तसेच पर्यटनासाठी विदेशात जाऊ इच्छिणाऱ्यांची संख्या अधिक आहे़ पासपोर्टसाठी आधार, मतदान ओळखपत्र, रहिवासी, पॅन कार्ड, जन्म दाखला इ. कागदपत्रे लागतात़ या सर्व कागदपत्रांच्या आधारे आॅनलाईन अर्ज केल्यानंतर पडताळणी होऊन महिनाभरामध्ये पासपोर्ट मिळू शकते़ तर एका व्यक्तीला दीड हजार अथवा दोन हजार रूपये शुल्क आकारले जाते़ दोन हजार रूपयांमध्ये ७२ पानांचा पासपोर्ट तर दीड हजार रूपयांमध्ये ३६ पानांचा पासपोर्ट मिळतो़
अशी आहे पासपोर्ट काढण्याची प्रक्रिया
पासपोर्ट काढू इच्छिणाऱ्यांनी आॅनलाईन नोंदणी करावी़ यासाठीचे शुल्कदेखील आॅनलाईन अथवा के्रडीट कार्डद्वारे करावे लागेल़ कागदपत्रे पडताळणीसाठी नांदेड सेंटरची निवड करावी़ अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर एआरएन सीटची प्रिंटआॅऊट काढून घ्यावी़ त्यावर दिलेल्या वेळेनुसार नांदेड येथील डाकघर पासपोर्ट सेवा केंद्रात पडताळणीसाठी उपस्थित राहून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी़ यानंतर सदर प्रस्ताव पुणे कार्यालयाकडे पाठविण्यात येतो़ पुढे पोलीस ठाण्यामार्फत चारित्र्य पडताळणी केली जाते़ या अहवालानंतर पासपोर्ट सादर केला जातो़ तो अर्जामध्ये दिलेल्या पत्त्यावर स्पीड पोस्टाने आपल्या घरी येईल. नागपूर, पुणे येथील कार्यालयाची माहिती नसल्याने एजंटामार्फत पासपोर्ट काढावा लागत असे़ त्यासाठी शुल्क वगळता दोन ते चार हजार रूपये एजंट घेत असे़ परंतु, नांदेडात केंद्र सुरू झाल्याने एजंटासह नागपूर, पुणे जाण्या-येण्याचा खर्च, तिथे एक दिवस राहणे, जेवण आदी जवळपास आठ ते दहा हजार रूपये खर्च अन् वेळेची बचत होत आहे़