Nanded: नवख्या मराठवाडा जनहित पार्टीचा धमाका; धर्माबादमध्ये भाजपला धोबीपछाड!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2025 20:12 IST2025-12-22T20:12:14+5:302025-12-22T20:12:30+5:30
मतदारांचा भाजप आमदारांना शह, मराठवाडा जनहित पार्टीला कौल देत धर्माबादेत परिवर्तन.

Nanded: नवख्या मराठवाडा जनहित पार्टीचा धमाका; धर्माबादमध्ये भाजपला धोबीपछाड!
धर्माबाद : येथील नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नवख्या मराठवाडा जनहित पार्टीचे नगराध्यक्ष व १५ उमेदवार विजयी झाले असून, नगरपरिषदेवर त्यांची एक हाती सत्ता आली आहे. केंद्रात, राज्यात एकहाती सत्ता असलेल्या या भागाचे आमदार असलेल्या भाजपला केवळ ७ जागेवरच समाधान मानावे लागले आहे.
दिग्गज पक्ष असलेल्या काँग्रेस, दोन्हीही शिवसेना, दोन्हीही राष्ट्रवादी व सपा, एमआयएम पक्षांना यांना एकही जागा जिंकता आली नसल्याने त्यांच्या नशिबात भोपळा मिळाला आहे. दिग्गज पक्षाचा नवख्या मराठवाडा जनहित पक्षाने चारी मुंड्या चित केल्या. धर्माबाद नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरू झाली होती. एक नगराध्यक्षपदासाठी नऊ उमेदवार रिंगणात उतरले होते तर २२ नगरसेवक जागेसाठी तब्बल १२५ उमेदवार रिंगणात थंड थोपटून उतरले होते. या निवडणुकीत काँग्रेस, दोन्हीही शिवसेना, दोन्हीही राष्ट्रवादी व एमआयएम, वंचित आघाडी, समाजवादी पार्टी व नव्यानेच स्थापन झालेली मराठवाडा जनहित पार्टी उतरली. या सर्व पक्षांच्या उमेदवारांना पराभूत केले. भाजपला केवळ ७ जागेवरच कौल दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व भाजप जोरदार प्रचारासह फिल्डिंग लावली होती. मतदाराने मराठवाडा जनहित पार्टीला अधिक कौल दिला आहे. एक नवीन पक्षाला संधी देऊन परिवर्तन घडवून आणले. भाजपकडून आमदार राजेश पवार व त्यांची पत्नी पूनम पवार व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)कडून आमदार प्रतापराव चिखलीकर, जिल्हाध्यक्ष शिवराज होटाळकर, शिरीष गोरठेकर, कैलास गोरठेकर यांनी निवडणुकीत ठाण मांडून होते; पण मतदारांनी मराठवाडा जनहित पार्टीच्या उमेदवाराला प्राधान्य दिले.
मराठवाडा जनहित पार्टीचे नगराध्यक्षा उमेदवार संगीता महेश बोलमवार यांचा विजय झाला असून, त्यांचे १५ उमेदवार विजयी झाले आहेत. मराठवाडा जनहित पार्टीचे संस्थापक-अध्यक्ष महेश बोलमवार यांनी व मोईजशेठ बिडीवाले यांनी विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न केले. आमदार राजेश पवार यांच्या नगराध्यक्ष उमेदवारांचा ५७१७ मतांनी मराठवाडा जनहित पार्टीने पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) तिसऱ्या स्थानावर आहे. काँग्रेस पक्षाचा उमेदवार चौथ्या स्थानावर आहे. तर शिंदेसेनेचे उमेदवार पाचव्या क्रमांकावर आहे. तर उद्धवसेनेचा उमेदवार सहाव्या क्रमांकावर आहे.