नांदेड : महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, प्रमुख राजकीय पक्षांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींच्या फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. प्रत्यक्ष नामनिर्देशनपत्र दाखल करण्यासही २३ डिसेंबरपासून प्रारंभ झाला असला तरी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होणार की बंडखोरी टाळण्यासाठी शेवटच्या क्षणी एबी फॉर्म देऊन उमेदवारी निश्चित करणार, याकडे लक्ष लागले आहे.
महापालिकेचा कार्यकाळ संपल्यावर तीन वर्षांचे प्रशासक राज नांदेडकरांनी अनुभवले. तसेच पदाविना राहण्याची सवय नसलेले लोकप्रतिनिधीदेखील निवडणूक कधी लागते म्हणून सैरभैर झाले होते. अनेक वर्षांपासून खोळंबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तत्काळ घेण्याचे आदेश न्यायालयाने दिल्याने आयोगाने निवडणूक कार्यक्रम घोषित केला. मात्र, आधी नगरपरिषदा, महापालिका की जिल्हा परिषद हे चित्र स्पष्ट नव्हते. त्यात मुदत संपलेल्या नगरपरिषदा व नगरपंचायतींची निवडणूक घाईघाईत घोषित झाली. या निवडणुकीत प्रचार करण्यास राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारांना पुरेसा वेळ मिळाला नाही. ही बाब लक्षात घेता, निवडणूक लागेल तेव्हा लागेल, राजकीय पक्षांकडून तिकीट मिळेल अथवा नाही याची तमा न बाळगता लढण्यासाठी रिंगणात उतरायचे, असे ठरविलेल्या उमेदवारांनी महापालिका व जिल्हा परिषद क्षेत्रात भेटीगाठीचा सिलसिला आधीपासूनच सुरू केला होता. सोबतच प्रमुख राजकीय पक्षांकडे तिकिटासाठी फिल्डिंग लावली जात आहे. त्यात महापालिकेची निवडणूक घोषित झाल्याने तयारीत असलेले उमेदवार प्रत्यक्ष रिंगणात उतरले आहेत.
गतवेळी नांदेड महापालिकेत काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता होती. ही सत्ता कायम राखण्याचे आव्हान काँग्रेस नेत्यांपुढे आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण हे भाजपत आल्याने त्यांच्या नेतृत्वात मागील निवडणूक लढविलेले महापालिकेतील बहुतांश शिलेदार भाजपत दाखल झाले आहेत. नांदेड दक्षिण व नांदेड उत्तर विधानसभा शिंदेसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत प्रभाव वाढविण्यासाठी शिंदेसेना संपूर्ण ताकद लावण्याची चिन्हे आहेत. याशिवाय, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रतापराव चिखलीकर हेदेखील जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी रणनीती आखत असून, त्यांनीही इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. सोबतच उद्धवसेना, वंचित बहुजन आघाडी, एमआयएमकडूनही इच्छुकांची चाचपणी केली जात आहे.