Nanded: लोहा पालिकेसाठी 'हाय-टेक' सुरक्षा! प्रभाग ५ मध्ये ड्रोनच्या नजरेत मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 15:12 IST2025-12-20T15:12:28+5:302025-12-20T15:12:55+5:30
या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने प्रथमच 'ड्रोन' कॅमेऱ्यांची मदत घेतली आहे.

Nanded: लोहा पालिकेसाठी 'हाय-टेक' सुरक्षा! प्रभाग ५ मध्ये ड्रोनच्या नजरेत मतदान
- गोविंद कदम
लोहा (नांदेड): लोहा नगरपालिका निवडणूक २०२५ अंतर्गत आज प्रभाग क्रमांक ५ मधील 'ब' या जागेसाठी फेरमतदान प्रक्रिया पार पडत आहे. या मतदानादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने प्रथमच 'ड्रोन' कॅमेऱ्यांची मदत घेतली आहे. प्रभाग परिसरात तणावपूर्ण शांतता असून, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू आहे.
ड्रोनचा प्रथमच वापर निवडणुकीच्या रिंगणात चुरस वाढल्याने प्रशासनाने सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही कसर सोडलेली नाही. मतदान केंद्र आणि संपूर्ण प्रभाग परिसरावर नजर ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळवणे आणि संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे सोपे झाले आहे. जिल्हा प्रशासनाचा हा 'हाय-टेक' प्रयोग लोह्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मैदानात मुक्काम सकाळपासूनच उमेदवार आणि कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुरज गुरव, उपविभागीय अधिकारी अश्विनी जगताप आणि पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी तातडीने हस्तक्षेप करत गर्दी पांगवली. निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल परळीकर आणि मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी केंद्रांना भेटी देऊन व्यवस्थेचा आढावा घेतला. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, प्रभाग ५ मध्ये सध्या मतदान शांततेत सुरू असून मतदार मोठ्या संख्येने बाहेर पडत आहेत.