नांदेडमध्ये पालकमंत्री चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार कोरोनाबाधित; अनेक अधिकारी विलगीकरणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 13:36 IST2020-07-20T13:25:55+5:302020-07-20T13:36:03+5:30
जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी यासह अनेक अधिकाऱ्यांना आता घरीच विलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे. आमदार राजूरकर कोरोनाबाधित; जिल्हाधिकारी, आयुक्तांसह अनेक अधिकारी विलागीकरणात

नांदेडमध्ये पालकमंत्री चव्हाण यांचे निकटवर्तीय आमदार कोरोनाबाधित; अनेक अधिकारी विलगीकरणात
नांदेड- पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे काही दिवसांपूर्वीच कोरोना मुक्त झाले आहेत. त्यात आता त्यांच्या निकटवर्तीय आमदाराला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, निवासी उपजिल्हाधिकारी यासह अनेक अधिकाऱ्यांना आता घरीच विलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे.
कोरोनामुक्त झाल्यानंतर अशोकराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठका घेऊन विकास कामे त्याचबरोबर कोरोनाचा आढावा घेणे सुरू आहे. शनिवारी दुपारपर्यंत अनेक विभागांच्या बैठका घेण्यात आल्या. या बैठकीला चव्हाण यांचे निकटवर्तीय विधान परिषदेचे आमदार अमरनाथ राजूरकर यांची ही पूर्णवेळ उपस्थिती होती. दरम्यान सोमवारी राजूरकर हे कोरोनाबाधित आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
बैठकीला उपस्थित अनेक अधिकाऱ्यांची आता कोरोना तपासणी होणार आहे. तर जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यासह अनेक अधिकारी यांना आता विलगीकरणात राहण्याची वेळ आली आहे. नांदेडमध्ये दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत असल्याने 23 जुलै पर्यंत संचारबंदी वाढविण्यात आली आहे . अशा परिस्थितीत अंमलबजावणी करणारे अधिकारीच आता अडचणीत आले आहेत.