Nanded: तेलंगणातील धरणातून विसर्ग, लेंडी नदीच्या प्रवाहाने देगलूरमधील गावांना पुराने वेढले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 20:18 IST2025-08-28T20:18:38+5:302025-08-28T20:18:51+5:30
कर्नाटककडे जाणारा निजामकालीन जुना पूल कोसळण्याच्या मार्गावर, वाहतूक ठप्प

Nanded: तेलंगणातील धरणातून विसर्ग, लेंडी नदीच्या प्रवाहाने देगलूरमधील गावांना पुराने वेढले!
- शेख शब्बीर
देगलूर ( नांदेड) : शेजारील तेलंगाणा राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती उद्भवली आहे. पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी निजामसागर धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे बॅक वॉटरचा फटका बसून देगलूर तालुक्यातील पाच गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच लेंडी धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने लेंडी नदी दुधडी भरून वाहत आहे. परिणामी अनेक गावांचा संपर्क तुटला असून लेंडी नदी लगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तेलंगणा राज्यातील निजामाबाद, कामारेड्डी व लगतच्या परिसरात मोठा पाऊस झाला आहे. त्यामुळे निजामसागर धरण ओसंडून वाहत असून २७ दरवाजे उघडण्यात आले आहे. परिणामी देगलूर तालुक्यातील तमलूर, सांगवी, शेवाळा, शेकापूर, शेळगाव व मेदनकल्लूर या गावांना बॅक वॉटर चा फटका बसून ही गावे पूर स्थितीने प्रभावित झाली आहेत. दरम्यान हसणाळ येथील घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तालुका प्रशासनाने बुधवारी संध्याकाळी व गुरुवारी सकाळी या गावातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतर करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले आहे.
मागील २४ तासांपासून देगलूर तालुक्यात पावसाचे संततधार सुरूच आहे. त्यातच लेंडी धरणाचे तेरा दरवाजे उघडण्यात आल्याने पाण्याचा विसर्ग वाढला आहे. तालुक्यातील लेंडी नदी दुधडी भरून वाहत असल्याने १) रामपूर ( पा) ते शहापूर, कुरुडगी ते नरंगल, करडखेड ते उदगीर, देगलूर ते देगाव, वन्नाळी ते लखा, नरंगल ते उमर सांगवी, हे रस्ते बंद झाले आहेत. तर कंधार येथील बारूळ धरणातील पाणी सोडण्यात आल्याने वझरगा येथील मन्याड नदीला पूर आल्याने अटकळी येथे रोड वरून पाणी जात असल्याने देगलूर ते नांदेड हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तालुक्यातील लेंडी, मन्याड व मांजरा नदी दुधडी भरून वाहत असल्याने या नदीलगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देत जिल्हाधिकारी कर्डिले यांनी शुक्रवारी दुपारी एक वाजेपर्यंत रेड अलर्ट घोषित केले आहे.
कर्नाटक राज्याला जोडणारा निजाम कालीन पूल कोसळण्याच्या मार्गावर?
देगलूर तालुक्यातून कर्नाटक राज्यातील बिदरला जोडणाऱ्या तालुक्यातील मौजे लोणी येथील "आडाची विहीर येथील" निजाम कालीन पूल कोसळण्याच्या मार्गावर असून या मार्गावरील वाहतूक ठप्प होऊन कर्नाटक राज्याचा संपर्क तुटण्याच्या मार्गावर आहे.