Nanded: ३६६ फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून पावणदोन लाखांचा दंड वसूल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 18:14 IST2025-10-15T18:13:32+5:302025-10-15T18:14:02+5:30
रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांविरुद्ध कारवाई

Nanded: ३६६ फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून पावणदोन लाखांचा दंड वसूल
नांदेड : दक्षिण मध्ये रेल्वेच्या नांदेड विभागाने रेल्वेतून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कारवाई करण्यासाठी १३ ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम राबविली. यामध्ये ३६६ विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांकडून रेल्वेने १ लाख ७६ हजार ३१५ रुपयांचा दंड वसूल केला आहे.
लिंबगाव स्थानक व परभणी-मुदखेड-हिमायतनगर सेक्शनदरम्यान सहायक वाणिज्य व्यवस्थापक एन. सुब्बाराव यांच्या नेतृत्वाखाली व विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कामले, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. जे. विजय कृष्णा, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक ऋतेश यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. या मोहिमेत एकूण १५ तिकीट तपासणी कर्मचारी, ४ वाणिज्य विभाग कार्यालयीन कर्मचारी, तसेच रेल्वे सुरक्षा बल यांनी सहभाग घेतला.
तब्बल १४ गाड्यांमध्ये तिकीट तपासणी करण्यात आली. या मोहिमेचा उद्देश विना तिकीट प्रवासाला आळा घालणे, अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणे, गुन्हेगारांमध्ये नैतिक भीती निर्माण करणे, तसेच प्रामाणिक प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायक प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणे हा होता. या कारवाईमुळे नेहमी विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे धाबे दणाणले आहेत.