२५ किसान रेल्वे चालविल्या, सव्वापाच कोटींचा महसूल
नांदेड : दमरेच्या नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात प्रजासत्ताक दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला. दरम्यान, नांदेड विभागाने कोरोनानंतरच्या काळात सुरू केलेल्या मालवाहतुकीमध्ये अत्यंत चांगली कामगिरी करत सव्वापाच कोटी रुपयांचा महसूल गोळा झाला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागभूषण राव यांच्यासह विविध रेल्वे अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबीय उपस्थित होते.
नांदेड रेल्वे विभागातील अधिकारी आणि कर्मचारी नांदेड यांनी कोरोना महामारीच्या काळामध्ये आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा केल्याबद्दल विभागीय रेल्वे व्यवस्थापक उपिंदर सिंघ यांनी कौतुक केले. या वर्षभरात नांदेड रेल्वे विभागातून श्रमिकांकरिता २८ श्रमिक विशेष गाड्या चालविण्यात आल्या. तसेच गेल्या वर्षभरात नांदेड रेल्वे विभागाने उन्हाळी सुट्ट्या आणि इतर सणानिमित्त १ हजार ६५ विशेष गाड्या चालविल्या. तसेच शेतीमालाच्या लवकर आणि किफायतशीर वाहतुकीकरिता नांदेड रेल्वे विभागातून ५ जानेवारीपासून किसान विशेष रेल्वे चालविण्यात येत आहेत. नांदेड रेल्वे विभागातून आत्तापर्यंत २५ किसान विशेष रेल्वे गाड्या चालविल्या आहेत. ज्यात प्रामुख्याने कांदा पाठविण्यात येत आहे. या किसान रेल्वे न्यू गुवाहाटी, न्यू जालपाईगुडी, चितपूर, मालडा, अगरतला आदी ठिकाणी पाठविण्यात आल्या आहेत. या वर्षी मार्च महिन्याअखेरीस आणखी ७५ किसान विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे उद्दिष्ट आहे.
तीन स्थानकात विलगीकरण कक्ष
नांदेड रेल्वे विभागाने नांदेड, पूर्णा आणि जालना येथे कोविड-१९ विलगीकरण कक्ष बनवले आहेत. ज्यात वाय-फाय इंटरनेट सुविधासह इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या वर्षी जालना रेल्वे स्थानकावर ४० सी.सी. टी. व्ही. कॅमेरे लावण्यात आले आहेत.
नांदेड रेल्वे स्थानकावरून निघणाऱ्या सर्व गाड्यांतील सर्व डब्यांना रोज सॅनिटायिझ करण्यात येत आहे. यावर्षी अकोला ते अकोट दरम्यान ४४.८ किलोमीटरचा नवीन ट्रेक बनविण्यात आला.
कर्मचाऱ्यांचा गौरव
उपिंदर सिंघ यांनी दक्षिण मध्य रेल्वे महिला कल्याण संगठन करत असलेल्या कार्याचा गौरव केला. कोरोना महामारीच्या काळात महिला कल्याण संगठनने पुढाकार घेऊन कार्मचाऱ्यांकरिता मास्क, सॅनिटायझर बनवले आणि मुबलक प्रमाणात पुरवठा केल्याचा विशेष उल्लेख केला. तसेच गरजूंना अन्नधान्याचे वाटप केल्याचे सांगितले.