नांदेड जिल्ह्यात ३ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा छदामही नाही मिळाला
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2020 03:55 IST2020-08-09T03:55:01+5:302020-08-09T03:55:17+5:30
शिष्यवृत्ती न मिळाल्याने लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांची आर्थिक होरपळ

नांदेड जिल्ह्यात ३ हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा छदामही नाही मिळाला
- अनुराग पोवळे
नांदेड : जिल्ह्यात २ हजार ९८१ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा एक छदामही मिळालेला नाही. त्यामुळे लॉकडाऊन काळात या विद्यार्थ्यांची आर्थिक होरपळ होत आहे़ त्याचवेळी जिल्ह्यात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील रक्कम देण्यासाठी तब्बल १८ कोटी ८१ लाख १६ हजार ६०० रुपयांची आवश्यकता असल्याचे समाजकल्याण आयुक्तांना कळविण्यात आले आहे.
जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील डॉ़ बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत नवीन व नूतनीकरण असे एकूण ६ हजार ८४४ विद्यार्थ्यांचे अर्ज समाजकल्याण विभागाकडे प्राप्त झाले होते़ त्यापैकी छाननीअंती ४ हजार ४४८ विद्यार्थ्यांचे अर्ज पात्र ठरले आहेत़ आजघडीला नवीन २ हजार ९८१ विद्यार्थ्यांचा पहिला व दुसरा हप्ता मिळून १४ कोटी २ लाख ९३ हजार १०० रुपये, नूतनीकरणाच्या ५०८ विद्यार्थ्यांच्या पहिल्या हप्त्यासाठी १ कोटी १ लाख ६० हजार रुपये आणि नूतनीकरणाच्या १ हजार ४७७ विद्यार्थ्यांना दुसरा हप्ता देण्यासाठी ३ कोटी ७६ लाख ६३ हजार ५०० रुपये आवश्यक आहेत़ शिष्यवृत्तीची एकूण रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी नांदेड समाजकल्याण विभागाला १८ कोटी ८१ लाख १६ हजार ६०० रुपये आवश्यक आहेत़
स्वाधार अवर राईट
२ आॅगस्टला शुद्धोधन कापसीकर यांनी टिष्ट्वटर व फेसबुक या माध्यमाद्वारे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधले़ तब्बल ११ हजार विद्यार्थ्यांनी टिष्ट्वटरवर ‘स्वाधार अवर राईट’ हा ट्रेन्ड चालविला़