विकासाच्या नावाखाली नांदेडकरांचा छळ; नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:01 IST2025-12-19T18:01:04+5:302025-12-19T18:01:34+5:30
प्रशासकराज' संपुष्टात आल्यावर तरी शहरातील रखडलेल्या विकासकामांना मिळेल का गती?

विकासाच्या नावाखाली नांदेडकरांचा छळ; नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांचा संताप
नांदेड : शहरात मागील दोन वर्षांपासून विकासकामांच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार सुरू असून, प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे नांदेडकरांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. 'अमृत २.०' योजनेअंतर्गत रस्ते, ड्रेनेज आणि पाणीपुरवठा योजनेची कामे शहरात सुरू असली, तरी या कामांचा वेग अत्यंत कासवगतीने असल्याने संपूर्ण शहराची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना वेठीस धरणार विकास काय कामाचा असा सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत.
सध्या शहरातील विविध प्रभागांत कोणत्याही पूर्वसूचनांशिवाय खोदकाम केले जात असून, अनेक ठिकाणी तर चार-सहा महिन्यांपूर्वीच लाखो रुपये खर्च करून तयार केलेले चकाचक सिमेंट रस्ते ड्रेनेजलाइनसाठी पुन्हा उकरले गेले आहेत. या अर्धवट कामांमुळे वाहनाधारकांसह पादचाऱ्यांना मोठा गैरसोयीचा सामना करावा लागत असून, चकाचक रस्त्यांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांच्या नशिबी आता केवळ खड्डेमय रस्ते आणि धुळीचे साम्राज्य आले आहे. शहरातील प्रमुख मार्गांवर होणारी भीषण वाहतूककोंडी पाहता, नागरिकांना घराबाहेर पडताना दहा वेळा विचार करावा लागत आहे. विकासाला विरोध नसला तरी, लोकांचा जीव धोक्यात घालून आणि दैनंदिन जगणे कठीण करून केला जाणारा असा विकास नक्की कोणासाठी, असा सवाल आता विचारला जात आहे. प्रशासनाने विकासकामे करताना आधी योग्य नियोजन करावे आणि कामांमुळे जनतेला त्रास होणार नाही याची लेखी ग्वाही द्यावी, अशी मागणी जोर धरत असून "वेठीस धरणारा विकास आम्हाला नकोच" अशा शब्दांत नांदेडकरांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
सहा महिन्यांतच नवीन रस्ता खोदला
शहरातील शिवाजीनगर ते गोकुळनगर स्टेडियमकडे जाणारा सीसी रस्ता जवळपास सहा महिन्यांपूर्वीच करण्यात आला होता. रस्त्याचे काम देखील पूर्ण झाले होते. मात्र, मागील पंधरवड्यात सदर नव्या रस्त्यावरच जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून ड्रेनेजलाइनचे काम करण्यात आले. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च पाण्यात गेला असून दुरुस्तीनंतरही रस्त्याची गुणवत्ता पूर्वीप्रमाणे राहणार नाही. त्यामुळे रस्ताकाम करण्यापूर्वी प्रशासनाला ड्रेनेजलाइन टाकण्याची आठवण आली नव्हती का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
या भागात रस्त्यावरून चालणे अवघड
शहरातील विद्युतनगर चौक, शाहूनगर, बाबानगर, आनंदनगर, वसंतनगर, विष्णुनगर, गोकुळनगर, शिवाजीनगर, श्रीनगर, तथागतनगर, वैशालीनगर, फारूखनगर, देगलूर नाका, केळी मार्केट, बाफना टी, हिंगोली नाका पॉइंट आदी भागांत रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून ड्रेनेजलाइन टाकण्यात आली आहे. खोदकामावर थोडीफार गिट्टी टाकून थातूरमातूर दुरुस्ती करण्यात आली. गिट्टीत वाहने फसत असल्याने अपघात होत असून या रस्त्यांनी पायी चालणे देखील कठीण बनले आहे.
घराबाहेर पडणे कठीण
विकासाला आमचा विरोध नाही; पण तो नियोजित असावा. आधीच रस्ते खराब असताना आहे ते रस्तेही उकरून ठेवल्यामुळे आम्हाला घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. मनपाने यावर तातडीने उपाययोजना करावी.
- साहेबराव लोहबंदे, नागरिक
निव्वळ पैशांचा अपव्यय
गेल्या दोन वर्षांपासून नांदेडच्या रस्त्यांची जी अवस्था झाली आहे, ती पाहवत नाही. नवीन सिमेंट रस्ते उकरून पुन्हा तिथेच पाइपलाइन टाकणे, हा निव्वळ पैशांचा अपव्यय आणि जनतेचा छळ आहे. प्रशासनाने कामाचे नियोजन करावे.
- देवानंद मुंदडा, नागरिक