खेळता खेळता भावाचा मुलगा आणि बहिणीची मुलगी कालव्यात बुडाले, कुटुंबावर दुःखाचा डोंगर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:59 IST2025-11-11T11:58:24+5:302025-11-11T11:59:15+5:30
कालव्याला नाही संरक्षक कठडा! भावंडांच्या निधनाने संपूर्ण गाव शोकाकुल

खेळता खेळता भावाचा मुलगा आणि बहिणीची मुलगी कालव्यात बुडाले, कुटुंबावर दुःखाचा डोंगर!
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (जिल्हा नांदेड) : तालुक्यातील निमगाव येथील दोन चिमुकली मुले खेळतांना कालव्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली आहे. यात भावाचा मुलगा तर दिवाळीला आलेल्या बहिणीची मुलगी या दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अर्धापूर तालुक्यातील निमगाव येथील रामा मोहन राठोड यांच्या मुलाचा मुलगा स्वस्तिक सचिन राठोड वय अडीच वर्षे रा . निमगाव ता.अर्धापूर व दिवाळीसाठी आलेली मुलीची मुलगी श्रावणी विठ्ठल चव्हाण वय २ वर्षे रा. बेलखेड ता. उमरखेड दोन्ही चिमुकली बालके खेळत खेळत घराच्या बाजूला असलेल्या एका कालव्यात बुडाली होती. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला. परंतु, मुले कुठेच सापडली नाहीत. काही वेळाने बाजुला असलेल्या इसापुरच्या कॅनॉलमध्ये दोघेही आढळून आले, हालचाल होत नसल्याने कुटुंबीयांनी त्यांना तात्काळ निमगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. घटनास्थळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम,पोउनी सुरेश भोसले यांनी भेट दिली.
ही दुर्दैवी घटना समजताच माजी आमदार माधवराव जवळगावकर, सभापती संजयराव लहानकर, सभापती गंगाधरराव चाभरेकर, आनंदराव भंडारे, नागोराव भांगे आदींनी घटनास्थळी भेट दिली. सदर घटना प्रकरणी पोलीसांकडून पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.