नांदेडात अनुदान याद्यांचा घोळ मिटेना; शेतकऱ्यांसाठीचे २६३ कोटी थकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 07:00 PM2018-09-22T19:00:45+5:302018-09-22T19:03:31+5:30

शेतकऱ्यांसाठी शासनाकडून २०१६ आणि २०१७ मध्ये मिळालेली रक्कम अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही़  

In Nanded 263 crore rupees funds of farmers remains undistributed | नांदेडात अनुदान याद्यांचा घोळ मिटेना; शेतकऱ्यांसाठीचे २६३ कोटी थकले

नांदेडात अनुदान याद्यांचा घोळ मिटेना; शेतकऱ्यांसाठीचे २६३ कोटी थकले

Next
ठळक मुद्दे पीकविमा मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त न झाल्याने अनुदान वाटपास विलंब , बँकांतील याद्यांचा घोळ मिटत नसल्याने अनुदानाचे जवळपास २६३ कोटी रूपये पडून आहेत.

- श्रीनिवास भोसले

नांदेड : अतिवृष्टीने नुकसान झालेल्या व पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून २०१६ आणि २०१७ मध्ये मिळालेली रक्कम अद्यापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही़  दरम्यान, पीकविमा मिळालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्राप्त न झाल्याने अनुदान वाटपास विलंब लागत असल्याचे प्रशासनाकडून शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे़ परंतु, बँकांतील याद्यांचा घोळ मिटत नसल्याने अनुदानाचे जवळपास २६३ कोटी रूपये प्रशासनाच्या खात्यात पडून आहेत.

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती धोक्यात आली आहे़ त्यातच शासनाने प्रधानमंत्री पीकविमा योजनेची योग्य अंमलबजावणी करण्याचे काम मागील काही वर्षांपासून सुरू केले आहे़ त्यामुळे पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना नुकसानीनंतरही पिकांचा योग्य मोबदला मिळत आहे़ परंतु, हजारो शेतकऱ्यांनी पीकविमा भरला नसल्याने त्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे़ त्यातच २०१६ मध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होवून हजारो हेक्टरवरील पीक गेले़ हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने काढून घेतल्याने हतबल झालेल्या लाखो शेतकऱ्यांच्या पीकविम्याचे कवच मिळाले़ तर पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांना सरकारने नांदेड जिल्ह्यासाठी २६१ कोटी ९६ लाख रुपये दिले़

यातून अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यात येणात आहे़ तर मागील वर्षात भोकर, किनवट, माहूर, मुदखेड आणि नायगाव या पाच तालुक्यांतील हजारो शेतकऱ्यांचा अतिवृष्टीचा फटका बसला़ त्यांना मदत म्हणून शासनाने ८५ लाख रूपये मंजूर करून ते जिल्हा प्रशासनाच्या खात्यात जमा केले़ परंतु, आजपर्यंत दोन्ही वर्षातील अनुदान वाटपास प्रत्यक्षात सुरूवात झाली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यातून रोष व्यक्त केला जात आहे़ 
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांना विमा मिळाला असेल त्यांना हे अनुदान देता येणार नाही़ त्यामुळे पीकविमा प्राप्त शेतकऱ्यांच्या याद्या बँकांकडून मिळविण्याचे काम संबंधित तहसील प्रशासन करीत असल्याचे समजते़ त्यातही वेगवेगळ्या बँकांना वेगवेगळी गावे दत्तक दिली आहेत़ पीकविमा वेगळ्या बॅकेत मिळाला तर गाव दत्तक वेगळ्याच बँकेत आहे़ त्यातच सरकारने छत्रपती शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली़ या निर्णयाची अंमलबजावणीत बँका गुंतल्याने पीकविम्यापासून वंचित शेतकऱ्यांच्या याद्या काढण्यात वेळ गेला़

मागील दोन वर्षांपासून सदर याद्यांचा घोळ मिटलेला नाही़ परिणामी शेतकऱ्यांचे २६३ कोटी रूपये प्रशासनाच्या खात्यात पडून आहेत़  यात २६१ कोटी ९५ लाख ९९ हजार रुपये हे २०१६ मधील अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना तर ८५ लाख रूपये हे २०१७ मधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पाच तालुक्यांसाठी आहेत़ नांदेड जिल्ह्यात आॅगस्ट २०१८ मध्ये बहुतांश मंडळात अतिवृष्टी होवून हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले़ त्यातच सलग रिमझिम पाऊस, दमट वातावरणामुळे सोयाबीन आणि कापसावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादुर्भाव झाला़ 

अतिवृष्टीच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांचे हेलपाटे
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या, परंतु विम्यापासून वंचित  शेतकऱ्यांची नावे बँकेकडून घेण्याचे तसेच काही ठिकाणी अनुदान वाटपाचे काम सुरू आहे़ वंचित शेतकऱ्यांचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी संतोष वेणीकर यांनी सांगितले़ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मिळालेली तालुकानिहाय रक्कम (कोटीमध्ये) नांदेड-१३़३४, मुदखेड-१९़५३, अर्धापूर- ११़४५ भोकर-७़४४, कंधार-१७़६३, लोहा-२९़४२, किनवट-२०़८३, माहूर-१३़०१, हदगाव -१५़१४, हिमायतनगर-८़५७, देगलूर- १९़९६,  मुखेड-३१़११  नायगाव -१३़२१, उमरी - ११़७६, धर्माबाद -११़८१ कोटी रूपये अनुदान मंजूर करण्यात आले आहे़ 
 

Web Title: In Nanded 263 crore rupees funds of farmers remains undistributed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.