Mukhed Nagar Parishad Election Result 2025: भाजपला धक्का! मुखेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतरही नगराध्यक्षपदी शिंदेसेनेच्या देबडवार विजयी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 12:48 IST2025-12-21T12:37:32+5:302025-12-21T12:48:09+5:30
आमदार डॉ. तुषार राठोड यांनी ही निवडणूक वैयक्तिक प्रतिष्ठेची केली होती.

Mukhed Nagar Parishad Election Result 2025: भाजपला धक्का! मुखेडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतरही नगराध्यक्षपदी शिंदेसेनेच्या देबडवार विजयी
नांदेड (मुखेड): अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या मुखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेवटच्या टप्प्यातील सभा होऊनही भाजपला नगराध्यक्षपद राखण्यात अपयश आले आहे. शिवसेना (शिंदे गट) उमेदवार विजया धोंडूराम देबडवार यांनी २०८८ मतांच्या फरकाने भाजपच्या विजया रामपत्तेवार यांचा पराभव करत मुखेडच्या नगराध्यक्ष पदावर नाव कोरले आहे.
आमदार डॉ. तुषार राठोड यांनी ही निवडणूक वैयक्तिक प्रतिष्ठेची केली होती. प्रचाराचा धुरळा उडवत त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तोफ मुखेडमध्ये डागली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतरही मतदारांनी शिवसेनेच्या पारड्यात आपले मत टाकले. विशेष म्हणजे, भाजपने १४ नगरसेवक निवडून आणत सभागृहात स्पष्ट बहुमत मिळवले आहे, पण नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत मात्र जनतेने शिवसेनेला साथ दिली.
निकाल आणि आकडेवारी
नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत विजया देबडवार यांना १०,३४७ मते मिळाली, तर भाजपच्या विजया रामपत्तेवार यांना ८,२५९ मतांवर समाधान मानावे लागले. नगरसेवक पदाच्या जागांमध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली असून त्यांचे १४ उमेदवार विजयी झाले आहेत, तर शिवसेनेचे केवळ ६ नगरसेवक निवडून आले आहेत.
देबडवार कुटुंबाची पकड कायम
२०१६ मध्येही बाबुराव देबडवार यांनी काँग्रेसच्या तिकिटावर थेट जनतेतून नगराध्यक्षपद मिळवले होते. आता २०२५ मध्ये हा वारसा विजया देबडवार यांनी शिवसेनेच्या माध्यमातून पुढे नेला आहे. नगरसेवक भाजपचे आणि नगराध्यक्ष शिवसेनेचा, अशा या विचित्र पेचप्रसंगामुळे मुखेडच्या विकासाचा गाडा आता 'महायुती'मधील समन्वयावर अवलंबून राहणार आहे.
मुखेड- मागील निवडणूक २०१६
नगराध्यक्ष कॉंग्रेस - बाबुराव देबडवार ( थेट जनतेमधून निवड),
नगरसेवक:
भाजप - ९,
रासप - २ ,
कॉंग्रेस - २,
शिवसेना ४
एकूण: १७