Mucormycosis : दिलासादायक ! नांदेडमध्ये १८८ पैकी ११८ रूग्ण म्युकरमायकोसीस मुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 13:52 IST2021-06-11T13:51:17+5:302021-06-11T13:52:50+5:30
Mucormycosis : आतापर्यत ११८ रूग्ण शस्त्रक्रिया व उपचारानंतर 'म्युकरमुक्त'

Mucormycosis : दिलासादायक ! नांदेडमध्ये १८८ पैकी ११८ रूग्ण म्युकरमायकोसीस मुक्त
नांदेड : कोरोनापश्चात तसेच अनियंत्रित रक्तशर्करा असलेले व स्टेरौड्स आणि इतर औषधांचा वापर झालेल्या रूग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार आढळून येत आहे. ह्या आजाराचे रूग्ण मागच्या दिड ते दोन महिन्यांपासून अचानक वाढ झाल्याचे समोर येत आहे. आतापर्यंत १८८ रूग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार निष्पन्न झाला आहे. त्यातील ११८ रुग्ण उपचारानंतर म्युकरमायकोसिस मुक्त झालेचे दिलासादायक चित्र आहे.
डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे एप्रिलच्या अखेरपासून ह्या आजाराची लक्षणे असलेले रूग्ण आढळुन येत आहेत. आतापर्यंत १८८ रूग्णांना म्युकरमायकोसिस हा आजार निष्पन्न झाला आहे. शासकिय रूग्णालयात १८८ रूग्णापैकी ११८ रुग्णावर विविध शस्त्रक्रिया कराव्या लागल्या. यामध्ये सर्व रूग्णावर नाकातून दुर्बीणद्वारे ( इन्डोस्कोपी) शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यापैकी ३४ रुग्णांमध्ये जबड्याची शस्त्रक्रिया करून कमी जास्त प्रमाणात वरचा जबडा काढावा लागला. तसेच आतापर्यंत ९२ रुग्णांना डोळ्याचा म्युकरमायकोसिस बाधा झाल्याचे आढळले. त्यांच्या डोळ्यामागे बुरशीनाशक इंजेक्शन (एम्फोटेरिसीन बी) देऊन रुग्णाचा डोळा वाचविण्यात आला. तसेच ४ रुग्णामध्ये पुर्ण डोळा शस्त्रक्रिया करून काढण्याची वेळ आली.
आतापर्यत ११८ रूग्णांना शस्त्रक्रिया करून व एम्फोटेरिसीन बी इन्जेक्शन देऊन 'म्युकरमुक्त' करण्यात यश आले आहे. या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या ३४ रुग्ण उपचाराखाली आहेत. कान नाक घसा विभागांतर्गत वर्षाला ५ ते १० म्युकरमायकोसिस वर शस्त्रक्रिया होतात. मात्र मागच्या दिड ते दोन महिन्यांत तब्बल ११८ म्युकरमायकोसिस वर शस्त्रक्रिया दुर्बिनीद्वारे ( इन्डोस्कोपीक) झाल्या. त्याशिवाय आवश्यक असे एम्फोटेरिसीन बी औषध सुरु आहे. अधिष्टाता डॉ.दिलीप म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कान नाक घसा विभागाप्रमुख डॉ.आतिश गुजराथी, नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ.विवेक सहस्त्र बुद्धे, डॉ.स्नेहल बुरकूले, दन्तरोग तज्ज्ञ डॉ. सुशील एमले, कान नाक घसा तज्ज्ञ डॉ निशिकांत गडपायले व डॉ योगेश पाईकराव तसेच १२ निवासी डॉक्टरांनी त्यासाठी परिश्रम घेतले.