- तुकाराम मोरे
भालकी (जि.बीदर) : शेतात खुरपणीसाठी गेलेल्या मायलेकीच्या अंगावर वीज कोसळल्याने जागेवरच मृत्यू झाल्याची घटना भालकी तालुक्यातील खुदावंदपूर येथे रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. मयतात सात वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी ही वीज पडली त्या ठिकाणी कुठलेही झाड किंवा झुडुपही नव्हते.
खुदावंदपुर गावातील भाग्यश्री भीमराव मेत्रे (२७) या आपली मुलगी वैशाली भीमराव मेत्रे (७) हिला सोबत घेऊन आपल्या शेतात खुरपणीसाठी गेल्या होत्या. रविवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास अचानक जोराचा पाऊस सुरू झाला. दोघी मायलेकी जवळच असलेल्या पत्र्याच्या शेडकडे जात असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. आईच्या हातात छत्री, स्टीलचे टिफीन बॉक्स होते. तर मुलीच्या हातात स्टीलची कळशी होती. ज्या ठिकाणी वीज पडली ती जागा मोकळी होती. आजूबाजूला कोणतेच झाड, झुडुपही नव्हते. स्टीलच्या धातुमुळे वीज पडली असावी असा तर्क केला जात आहे. भाग्यश्री यांना आणखी दोन मुली व मुलगा आहे. पती भीमराव हे आपली दोन ते तीन एकर शेती सांभाळून इतर लोकांच्या जमिनी करून उदरनिर्वाह करत होते. आईच्या निधनामुळे तीन मुलांचे मातृत्व हरवले आहे. घटनेची माहिती मिळताच मेहकर पोलीस ठाण्याचे पीएसआय नंदकुमार मुळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दोघी मायलेकीचे मृतदेह शवविच्छेदनासाठी भालकीच्या शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.