विधानसभा, लोकसभेच्या तुलनेत ग्रामपंचायतीला अधिक मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:22+5:302021-02-05T06:09:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीचे मतदान होत असल्याचे यंदा झालेल्या निवडणुकीवरून ...

विधानसभा, लोकसभेच्या तुलनेत ग्रामपंचायतीला अधिक मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ग्रामपंचायत निवडणुकीत चुरशीचे मतदान होत असल्याचे यंदा झालेल्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. विधानसभा आणि लोकसभेसाठी २०१४ आणि १९ या वर्षात जनजागरण मोहिमा राबवूनही मतदानाचा टक्का ६५ टक्क्यांच्या पुढे सरकलेला नाही. या तुलनेत ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा तब्बल ८१.८६ टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून ग्रामीण भागातील मतदार मतदानाबाबत जागरूक असल्याचे दाखवून दिले आहे.
लोकसभा निवडणुकीत कायम चुरस राहिली आहे. २०१४ मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघात ६१ टक्के मतदान झाले होते. २०१९ मध्ये यात ४ टक्के वाढ होत मतदानाचा टक्का ६५ टक्क्यांवर गेला. तरुण मतदारांनी या निवडणुकीत मोठ्या संख्येने सहभाग घेतल्याचे पुढे आले होते. मात्र ६५ टक्के हा टक्काही समाधानकारक नव्हता. विधानसभेच्या निवडणुकातही मागील दोन निवडणुकात जिल्ह्यात ६५ टक्के एवढेच दोन्ही वेळेला मतदान झाले. त्या तुलनेत ग्रामपंचायत निवडणुका मात्र खऱ्या अर्थाने चुरशीच्या झाल्या. तब्बल ८१.८६ टक्के मतदारांनी यावेळी मतदानाचा हक्क बजावला.
लोकसभेसाठी मतदान
n २०१४च्या तुलनेत २०१९च्या लोकसभा निवडणुकीत ४ टक्क्यांनी मतदान वाढल्याचे दिसून आले होते. २०१४ मध्ये नांदेडमध्ये ६१ टक्के मतदानाची नोंद झाली होती, तर २०१९ मध्ये नांदेड जिल्ह्यात विधानसभेसाठी ६५ टक्के मतदान झाले होते.
विधानसभेसाठी मतदान
n २०१४ आणि २०१९ या दोन्ही विधानसभा निवडणुकांना जिल्ह्यात ६५ टक्के मतदानाची नोंद झाली होती हे विशेष. २०१९च्या निवडणुकीत सर्वाधिक ७२.५३ टक्के मतदान नायगावमध्ये, तर सर्वात कमी ५९.९३ टक्के मतदान नांदेड उत्तर मतदारसंघात झाले होते.
ग्रामपंचायतीसाठी यंदा विक्रमी मतदान
n ग्रामपंचायतीसाठी यंदा विक्रमी ८१.८६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. १० लाख ७८ हजार २७५ जणांनी मतदान केले. यामध्ये ५ लाख १० हजार ३०८ स्त्री मतदार, तर ५ लाख ६७ हजार ९६६ पुरुष मतदारांचा समावेश होता. यामध्ये नांदेड तालुक्यात ७५.५६, अर्धापूर ८३.९०, भोकर ८३.७५, मुदखेड ८२.१४, हदगाव ७९.६३, हिमायतनगर ८२.९६, किनवट ७९.४३, माहूर ८१.३५, धर्माबाद ८२.३८, बिलोली ८२.१६, नायगाव ८१.५३, देगलूर ८०.७४, मुखेड ८०.६५, कंधार ८१.४९ तर लोहा तालुक्यात ८५.३६ टक्के मतदान झाले.