धर्माबादमध्ये मतदानासाठी पैसे वाटप, मतदारांना मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 12:44 IST2025-12-20T12:44:11+5:302025-12-20T12:44:44+5:30
पैसे वाटपाच्या या आरोपांमुळे आणि मतदारांना डांबून ठेवण्याच्या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धर्माबादमध्ये मतदानासाठी पैसे वाटप, मतदारांना मंगल कार्यालयात कोंडून ठेवल्याचा आरोप
धर्माबाद (नांदेड): धर्माबाद नगरपालिका निवडणुकीसाठी आज (२० डिसेंबर) मतदान पार पडत असतानाच शहरात एकापाठोपाठ एक धक्कादायक घटना घडल्या आहेत. एका मंगल कार्यालयात मतदारांना पैसे वाटपासाठी कोंडून ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून, यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत या मतदारांची सुटका केली आहे. पैसे वाटपाच्या या आरोपांमुळे आणि मतदारांना डांबून ठेवण्याच्या प्रकारामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ईनानी मंगल कार्यालयात नेमकं काय घडलं?
शहरातील बन्नाळी भागातील ईनानी मंगल कार्यालयात भाजप उमेदवाराकडून मतदारांना पैसे वाटले जात असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. सुमारे शंभर ते दीडशे मतदारांना येथे आणण्यात आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, पैसे वाटपावरून गोंधळ निर्माण झाला आणि वातावरण बिघडले. यावेळी काही मतदारांनी "आम्हाला येथे कोंडून ठेवले आहे," असा गंभीर आरोप करत आरडाओरडा सुरू केला. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि मंगल कार्यालयातील मतदारांना बाहेर काढले.
मतदान केंद्रावर नेत्यांमध्ये जुंपली!
दुसरीकडे, प्रभाग क्रमांक ८ मध्ये मतदान केंद्रावर राजकीय नेत्यांमध्ये थेट बाचाबाची झाली. भाजपच्या पुनम पवार आणि राष्ट्रवादीचे (अजित पवार गट/शरद पवार गट) दिग्गज नेते कैलास गोरठेकर व शिवराज पाटील होटाळकर हे समोरासमोर आले. उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी मध्यस्थी करत जमावाला पांगवले आणि मतदान प्रक्रिया सुरळीत केली.