नांदेड : विधानसभा निवडणुकीत भाजप-शिंदेसेना-राष्ट्रवादी (अजित पवार) महायुतीने जिल्ह्यात १०० टक्के स्ट्राइक रेट साधला. विशेष म्हणजे नांदेड उत्तर व नांदेड दक्षिण या दोन्ही शहरी मतदारसंघात शिवसेनेचा भगवा पहिल्यांदाच फडकला. या यशानंतर आता विद्यमान आमदारांचा महापालिका निवडणुकीत कस लागणार असून, केवळ सत्ता नाही तर कार्यकर्त्यांना निवडून आणण्याची आणि मनपावर भगवा फडकविण्याचे आव्हान आमदारांसमोर आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच कार्यकर्त्यांच्या म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत. नांदेड उत्तरचे आमदार बालाजीराव कल्याणकर हे दुसऱ्यांदा आमदार झाले असले तरी त्यांच्या मागील कार्यकाळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्याच नव्हत्या. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी पहिलीच मोठी राजकीय परीक्षा ठरणार आहे, तर नांदेड दक्षिणमधून विधानसभेत गेलेले आमदार आनंदराव बोंढारकर यांच्यासाठी तर महापालिकेची निवडणूक पूर्णपणे नवखी आहे. मात्र, शहरी भागातील या दोन्ही मतदारसंघांवर शिंदेसेनेचे वर्चस्व असल्याने कार्यकर्त्यांच्या अपेक्षा प्रचंड वाढल्या आहेत. मात्र, याच ठिकाणी भाजपसोबत असलेल्या युतीला काडीमोड करत शिंदेसेनेने स्वतंत्र ताकद दाखवण्याचा प्रयत्न केल्याने महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.
नामदार अन् आमदारांत बिनसलेले...सत्ताधारी मित्रपक्षांसोबत युती करण्यावरून तसेच नांदेड उत्तर मतदारसंघातील उमेदवार ठरविण्यावरून नामदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्यात एकमत होवू शकले नाही. काही जागांवरून त्यांच्यात चांगलेच बिनसल्याचे समजते. नामदार पाटील यांनी शिफारस केलेल्या उमेदवारांनाही कल्याणकरांनी बी फाॅर्म दिला नसल्याची चर्चा शिंदेसेनेत आहे. परिणामी पाटील हे अद्याप नांदेड उत्तरमध्ये फिरकले नाहीत. मात्र, आपले घर अन् मळाही उत्तरमध्येच आहे. त्यामुळे प्रचाराला जावे लागेल, असे मत त्यांनी पत्रकारांशी बोलताना मांडले.
दक्षिण मतदारसंघात मात्र चित्र वेगळे आहे. नामदार हेमंत पाटील हे गल्लोगल्ली फिरून तेथील उमेदवारांसाठी प्रचार करत असून, आमदार बोंढारकर त्यांच्यासोबत आहेत. परिणामी उत्तर मतदारसंघात मात्र अस्वस्थता वाढताना दिसते. येथे शिंदेसेनेचे तब्बल ४० उमेदवार असतानाही प्रमुख नेते, पदाधिकारी यांचा वावर कमी असल्याची चर्चा रंगली आहे.
Web Summary : Nanded MLAs face challenge in municipal elections after a successful assembly performance. Internal disputes within the Shinde Sena and differences between leaders in Nanded North add complexity. South constituency shows better unity.
Web Summary : नांदेड में विधानसभा चुनावों के बाद, नगर पालिका चुनावों में विधायकों की प्रतिष्ठा दांव पर है। शिंदे सेना के भीतर आंतरिक विवाद और नांदेड उत्तर में नेताओं के बीच मतभेद चुनौती बढ़ा रहे हैं। दक्षिण निर्वाचन क्षेत्र में बेहतर एकता दिख रही है।