नशेखोरांच्या हाती आता मेफेनटरमीनचे इंजेक्शन; रुग्णालयात जबरदस्ती होतेय मागणी
By शिवराज बिचेवार | Updated: August 18, 2023 18:24 IST2023-08-18T18:24:22+5:302023-08-18T18:24:32+5:30
बाजारात सहज उपलब्ध असलेल्या कॅफेनची मात्रा असलेल्या सॉफ्ट ड्रिंकचा लहान मुलेही नशेसाठी वापर करीत आहेत.

नशेखोरांच्या हाती आता मेफेनटरमीनचे इंजेक्शन; रुग्णालयात जबरदस्ती होतेय मागणी
नांदेड- बाजारात उपलब्ध असलेल्या अनेक औषधी तसेच कॅफेनची मात्रा असलेली सॉफ्ट ड्रिंकचा वापर नशेसाठी सर्रास करण्यात येत आहे. परंतु आता ब्लडप्रेशर वाढविण्यासाठी वापरण्यात येणार्या मेफेनटरमीन या इंजेक्शनचा नशेसाठी वापर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामध्ये वेगवेगळ्या मैदानी खेळात आपला परफॉरमन्स वाढविण्यासाठी खेळाडूही त्याच्या आहारी गेले आहेत. काही तर चक्क या इंजेक्शनसाठी खाजगी रुग्णालयाला तगादा लावत आहेत. याबाबत काही डॉक्टरांनी तक्रारीही केल्या आहेत.
बाजारात सहज उपलब्ध असलेल्या कॅफेनची मात्रा असलेल्या सॉफ्ट ड्रिंकचा लहान मुलेही नशेसाठी वापर करीत आहेत. एकाच दिवशी साधारणता दोन ते तीन लिटर सॉफ्ट ड्रिंक घेतल्यानंतर अशा व्यक्तीची झोप उडते. परंतु मेंदू अलर्ट राहतो. परंतु अशाप्रकारच्या ड्रिंकच्या विक्रीवर कोणाचेही निर्बंध नाही. त्यातच आता एखाद्या रुग्णाचे ब्लडप्रेशर कमी असेल तर अशा रुग्णांना मेफेनटरमीन हे इंजेक्शन दिले होते. त्याच इंजेक्शनच्या नशेची काही जणांना सवय लागली आहे. जीम मध्ये अनेक तास व्यायाम करताना थकवा येवू नये, मैदानी खेळांमध्ये आपला परफॉरमन्स वाढवा या उद्देशानेही काही जण हे इंजेक्शन घेत आहेत. हे एक प्रकारचे उत्तेजक औषध आहे. परंतु त्याचा नशेसाठी वापर करण्यात येत आहे. त्यामुळे ह्दयाचे ठोके वाढून अचानक स्ट्रोक येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे हे इंजेक्शन मिळविण्यासाठी नशेबाज वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून रुग्णालये गाठत आहेत. हा प्रकार अनेक डॉक्टरांच्या बाबतीत घडला आहे. त्यामुळे डॉक्टरांनीही आता तक्रारी करण्यास सुरुवात केली आहे.
मेफेनटरमीनच्या वापरात झाली वाढ
बाजारात कॅफेनयुक्त सॉफ्ट ड्रिंकची अनेकजण नशा करीत आहेत. दररोज असे रुग्ण येत आहेत. त्यातच मेफेनटरमीनच्या इंजेक्शनचाही उत्तेजक म्हणून काही जण वापर करीत आहेत. नुकतेच तसा एक रुग्ण आला होता. परंतु या इंजेक्शनच्या वापरामुळे ह्दयाचे ठोके वाढतात. त्यामुळे स्ट्रोक होवून मेंदूमध्ये रक्तस्त्राव होण्याची शक्यता अधिक आहे. - डॉ.रामेश्वर बोले, मानसोपचार तज्ज्ञ