मराठा आरक्षण दिंडी! ट्रॅक्टरवर संसार थाटून मराठ्यांचं बिऱ्हाड निघालं मुंबईकडे
By श्रीनिवास भोसले | Updated: January 19, 2024 19:10 IST2024-01-19T19:09:52+5:302024-01-19T19:10:12+5:30
लोहा तालुक्यातील जिजाऊनगर वाडी पाटी येथील ४०-४५ जणांचा जथा हा एक दिवस अगोदरच रवाना

मराठा आरक्षण दिंडी! ट्रॅक्टरवर संसार थाटून मराठ्यांचं बिऱ्हाड निघालं मुंबईकडे
नांदेड : लोहा तालुक्यातील जिजाऊनगर वाडी पाटी येथे जरांगे पाटील यांची सभा आयोजिली होती. त्या ठिकाणच्या समाज बांधवानी लक्षवेधक तयारी केली आहे. अख्खा संसार ट्रॅक्टरवर थाटला असून ४०-४५ जणांचं बिऱ्हाड अंतरवाली सराटी कडे रवाना झालं आहे.
ट्रॅक्टरच्या ट्रॉली वरतीच आपला जवळपास दोन महिन्यांचा संसार थाटला आहे. मोबाईल चार्जिंगसाठी प्लग, रात्रीच्या अंधारात लाईटची व्यवस्था, जवळपास २५० लिटर एवढ्या प्रमाणात फिल्टर पाणी, जनरेटर व ते चार्जिंग करण्यासाठी सौर प्लेट, झोपायला गाद्या व स्वयंपाक करण्यासाठी दोन गॅस सिलिंडर शेगडी आणि किमान दोन महिने पुरेल इतके भोजन साहित्य. हे सर्व एका ट्रॅक्टरमध्ये व्यवस्थित मांडणी करून ४०-४५ जणांचा जथा हा एक दिवस अगोदरच रवाना झाला आहे.
अशा प्रकारची वेगवेगळी वाहने तयार करून कंधार, लोहा, मुखेड, देगलूर, नायगाव, मारतळाबिलोली, धर्माबाद, उमरी मुदखेड, भोकर, अर्धापूर, हिमायतनगर, हदगांव यासह अनेक ठिकाणाहून मराठ्यांचे जथे च्या जथे मुंबईच्या दिशेने कुच करणार आहेत.