'नोटबंदी' सारखी 'वोटबंदी' करा! शेतकऱ्यांच्या फसवणुकीवर उद्धव ठाकरेंचा एल्गार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 13:55 IST2025-11-07T13:55:19+5:302025-11-07T13:55:57+5:30
'मुख्यमंत्र्यांना न्याय मागितला तर टोमणा दिसतो!' अर्धापूरमधून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्ला

'नोटबंदी' सारखी 'वोटबंदी' करा! शेतकऱ्यांच्या फसवणुकीवर उद्धव ठाकरेंचा एल्गार
- गोविंद टेकाळे
अर्धापूर (नांदेड): शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन हवेत विरले, तर अतिवृष्टीच्या मदतीच्या नावावर फक्त घोषणा झाल्या. या फसव्या सरकारच्या विरोधात आता 'नोटबंदी' सारखी 'वोटबंदी' करण्याची वेळ आली आहे, असे आक्रमक आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज नांदेड जिल्ह्यातील पार्डी येथे केले.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. "मी तुमच्या वेदना विचारण्यासाठी आलोय. पण मुख्यमंत्र्यांना न्याय मागितला तर ते म्हणतात, 'उद्धव ठाकरे फक्त टोमणे मारतात.' कर्जमाफी करा, हेक्टरी ५० हजार रुपये द्या, हा टोमणा नाही, हा शेतकऱ्यांचा न्यायाचा आवाज आहे!" असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
फडणवीसांच्या व्यस्ततेवर टीका करताना ते म्हणाले, "मुख्यमंत्री म्हणतात, 'आंदरकी बात है', पण ते बिहारच्या प्रचारात आणि बस, पान टपरीच्या उद्घाटनात व्यस्त आहेत. ते जमीन घोटाळ्यावर पांघरूण घालत आहेत, त्यामुळेच त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नाही."
निवडणुकीत 'वोटबंदी' करा
माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला धारेवर धरले. सरकारने जाहीर केलेल्या ३२ हजार कोटींच्या मदतीवर शंका उपस्थित करत "ती मदत खरोखर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का?" असा सवाल त्यांनी केला.
ठाकरे यांचे शेतकऱ्यांना थेट आवाहन
" जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, पीकविमा मिळत नाही, तोपर्यंत महायुतीला मत देऊ नका. शेतकऱ्यांचा कोपऱ्याला गुळ लावणाऱ्या फसव्या सरकारच्या विरोधात शेतकरी म्हणून एकजूट व्हा आणि नोटबंदी सारखी वोटबंदी करा." या संवाद कार्यक्रमाला माजी विरोधीपक्षनेते अंबादास दानवे, खासदार नागेश अष्टीकर यांच्यासह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.