माहूर माहूर - आदिलाबाद रेल्वे मार्ग लालफितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:13 IST2021-01-01T04:13:10+5:302021-01-01T04:13:10+5:30
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष माहूर : रेल्वेमार्गाच्या अभियांत्रिकी तथा वाहतूक सर्व्हेला हिरवी झेंडू मिळून पाच वर्षे लोटली तरी हा मार्ग लालफितीतच ...

माहूर माहूर - आदिलाबाद रेल्वे मार्ग लालफितीत
लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
माहूर :
रेल्वेमार्गाच्या अभियांत्रिकी तथा वाहतूक सर्व्हेला हिरवी झेंडू मिळून पाच वर्षे लोटली तरी हा मार्ग लालफितीतच अडकला आहे. लोकप्रतिनिधींकडून माहूर-अदिलाबाद-वाशिम मार्गे पुसद या रेल्वे मार्गासाठी पाहिजे तसे प्रयत्न केले जात नसल्याने या दळणवळणाचा ज्वलंत प्रश्न मागे पडला आहे.
गेल्या १५ वर्षांपासून चर्चेत असलेल्या माहूर - पुसद - वाशिम - आदिलाबाद रेल्वे मार्गाबाबत केवळ कागदी घोडे नाचविले जात आहे. हिंगोलीचे तत्कालीन खासदार ॲड. राजीव सातव, वाशिमच्या खासदार भावना गवळी व आदिलाबादचे खासदार या तिघांनी त्यांच्या काळात संयुक्त पत्र रेल्वे मंत्रालयाला देऊन पाठपुरावा केला होता. त्यानंतर २०१३ च्या रेल्वे अर्थसंकल्पात रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यासाठी तरतूदही करण्यात आली होती. अनेक दशकांपासून रेल्वे मार्गापासून वंचित असलेल्या माहूर - आदिलाबाद - वाशिम मार्गे पुसद या २२५ किमीच्या रेल्वे मार्गाचा अभियांत्रिकी तथा वाहतूक सर्व्हे गत चार वर्षांपूर्वी २०१६ मध्ये मंजूर करण्यात आला होता. यासाठी २६४५.८५ कोटींचा प्रस्ताव रेल्वे बोर्ड भारत सरकारकडे सादर करण्यात आला होता; परंतु अद्याप प्रत्यक्षात सर्वेक्षणाला गती मिळाली नसल्याने माहूर रेल्वेचा प्रश्न थंड बस्त्यात पडला आहे. दरम्यान, २०१७ मध्ये केंद्राच्या रेल्वे स्थायी समितीवर काँग्रेसचे गुजरात प्रभारी या विभागाचे खासदार राजीव सातव यांची निवड झाल्याने माहूर रेल्वेलाईनच्या आशा पल्लवित होऊन हा प्रश्न ते निकाली काढतील. असे वाटले होते. मात्र, असे झाले नाही. अद्याप सरकारकडून या मार्गाच्या सर्व्हेला वेग आला नाही. हा रेल्वे मार्ग सुरू झाल्यास मराठवाड्यातील माहूर तेलंगणातील आदिलाबाद ते बंजारा समाजातील काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या विदर्भातील तीर्थक्षेत्र पोहरादेवीला जोडला जाणार आहे. याचा फायदा भाविकांसह ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना होणार आहे. हा मार्ग हिंगोली व वाशिम लोकसभा मतदारसंघातून जात असल्याने अनुक्रमे खा. हेमंत पाटील व खा. भावना गवळी हा अतिमहत्त्वाकांक्षी प्रश्न मार्गी लावतील, अशी अपेक्षा माहूरगडावरील आई रेणुका, भगवान दत्त प्रभू, बाबा सोनापीर, संत सेवालाल महाराज यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या भाविकांसह येथे वास्तव्यास असणाऱ्या आदिवासी, बंजारा व १८ पगडजातींच्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.
माहूर हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून, याठिकाणी राज्यातून नव्हे तर परराज्यांतूनही भाविक दर्शनासाठी येत असतात. हीच बाब हेरून तत्कालीन रेल्वेमंत्री लालू प्रसाद यादव यांनी किनवट येथील ब्रॉडगेज शुभारंभप्रसंगी माता के गाव रेल पोहचायंगे, अशी घोषणा केली होती. मात्र, ती घोषणा हवेत विरली असून, त्यानंतर तीन रेल्वेमंत्री बदलले तरी माहूर - वाशिम रेल्वे मार्गाचा गाडा पुढे सरकलेला नाही. हिंगोली, वाशिम व आदिलाबाद येथील खासदारांनी या सर्वेक्षणाच्या बाबतीत संसदेत आवाज उठवावा, अशी मागणी माहूरगडावरील देवी-देवतांवर श्रद्धा ठेवणाऱ्या भाविकांची व शहरातील नागरिकांची आहे.
- डॉ.सत्यम गायकवाड
जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, नांदेड.