सेना- भाजप युतीच्या शक्यतेमुळे इच्छुक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 04:27 PM2019-09-24T16:27:31+5:302019-09-24T16:31:21+5:30

मुंबईत राजकीय हालचालींना वेग  

Maharashtra Assembly Election 2019 : many aspirant upset over Shivsena - BJP alliance possibility | सेना- भाजप युतीच्या शक्यतेमुळे इच्छुक हवालदिल

सेना- भाजप युतीच्या शक्यतेमुळे इच्छुक हवालदिल

Next
ठळक मुद्देआठ जागांवर सेना-भाजपामध्ये समझोता  किनवट मतदारसंघावरून रस्सीखेच

- विशाल सोनटक्के

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघापैकी आठ मतदारसंघांचा विषय निकाली निघाला असून किनवट मतदारसंघावरून सेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरू आहे़ दरम्यान, शिवसेना-भाजपाच्या युतीची शक्यता वाढल्याने मागील काही वर्षांपासून निवडणुकीची तयारी करीत असलेल्या इच्छुकांच्या अपेक्षेवर विरजन पडले आहे़ युतीसोबतच राहायचे की स्वतंत्र लढण्याचा निर्णय घ्यायचा यावरून इच्छुकांंत घालमेल सुरू आहे़

शिवसेना-भाजपाची युती होणार की नाही यावरून मागील काही दिवसांपासून उलटसुलट चर्चा सुरू आहे़ दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र युती होणार असल्याचे ठामपणे सांगत आहेत़ या दोन्ही पक्षांच्या मुंबईत बैठकांवर बैठका सुरू असून जवळपास युती निश्चित झाली असून याबाबतची अधिकृत घोषणा लवकरच होणार असल्याचे भाजपाच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने सांगितले़ शिवसेना-भाजपा हे दोन्ही पक्ष युतीसाठी आग्रही आहेत़ मात्र मागील काही दिवसांत या दोन्ही पक्षात मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झालेले आहे़ त्यामुळेच सुमारे २५ ते ३० जागांवर चर्चा सुरू असल्याने युतीची घोषणा करण्यास विलंब होत असल्याचे या सूत्राचे म्हणणे आहे़  

तीन दिवसांपूर्वी नांदेड जिल्ह्यातील ९ जागांच्या वाटपासंदर्भात सेना-भाजपा प्रत्येकी ४ तर नायगावची जागा मित्रपक्षाला सोडण्याचा फॉर्मुला पुढे आला होता़ या फॉर्मुल्यानुसार किनवट, भोकर, मुखेड आणि कंधार हे विधानसभा मतदारसंघ भाजपाकडे तर उत्तर नांदेड, दक्षिण नांदेड, देगलूर आणि हदगाव हे चार विधानसभा मतदारसंघ शिवसेनेकडे सोडण्याच्या विषयावर चर्चा झाली़ परंतु तीन ऐवजी चार जागा मिळाव्यात, यासाठी शिवसेना आग्रही आहे़ त्यामुळेच किनवटच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असून भाजपाने ही जागा शिवसेनेसाठी सोडल्यास युतीचा विषय मार्गी लागू शकतो़ दुसरीकडे नायगाव विधानसभा मतदारसंघ मित्रपक्षाला सोडण्यावर दोन्ही पक्षांनी शिक्कामोर्तब केल्याचे समजते़ नायगावची जागा मित्रपक्षाला सोडली तरी या जागेवर कोणाला उमेदवारी द्यायची याचा निर्णय मात्र भाजपा नेत्या पंकजा मुंडे याच घेणार असल्याने ही जागाही एका अर्थाने भाजपाकडेच राहणार आहे़ 

दरम्यान, मागील काही दिवसांत शिवसेना-भाजपातील नेते एकमेकांवर टोकाची टीका करीत होते़ त्यातच दोन्ही पक्षांनी काँग्रेस-राष्ट्रवादीमधून अनेकांना आपआपल्या पक्षात घेतलेले असल्याने सेना-भाजपाची युती होणार नाही, असेच अनेकांचे मत झालेले आहे़ त्यातूनच सेनेसह भाजपानेही विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याच्या दृष्टीने तयारी केली आहे़ मात्र आता ऐनवेळी युती झाल्यास स्वबळाची तयारी केलेले             हे इच्छुक काय भूमिका घेतात, यावरून विधानसभा निवडणुकीच्या लढतीचे चित्र ठरणार आहे़ 

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची जोरदार तयारी

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने जोरदार तयारी केली आहे़ किनवट आणि लोहा-कंधार मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असून नांदेड शहरातील दोन्ही जागांसह सात जागांवर काँग्रेस लढणार आहे़ काँग्रेसच्या दृष्टीने भोकर मतदारसंघ प्रतिष्ठेचा ठरणार आहे़ येथून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने चव्हाण यांनी भोकर मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे़ दुसरीकडे भोकर मतदारसंघातील लढत अशोक चव्हाण विरूद्ध बापूसाहेब गोरठेकर अशी न होता अशोक चव्हाण विरूद्ध प्रताप पाटील चिखलीकर अशी होण्याच्या दृष्टीने भाजपा रणनीती आखत आहे़ 

वंचितमध्ये नांदेड, उत्तर-दक्षिणमध्ये रस्सीखेच
विधानसभा निवडणुकातही जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात वंचित बहुजन आघाडी फॅक्टर महत्त्वपूर्ण ठरणार आहे़ या अनुषंगाने आघाडीच्या वतीने उमेदवारांची नावे अंतिम करण्यात येत आहेत़ बिलोली-देगलूर विधानसभा मतदारसंघातून रामचंद्र भरांडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे़ तर किनवट मतदारसंघातून प्रा़हमराज उईके आणि मुखेड मतदारसंघातून यशपाल भिंगे रिंगणात उतरण्याचे संकेत मिळत आहेत. लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून वंचिततर्फे विनोद पापीनवार यांचे नाव पुढे आहे़ तर भोकरमध्ये नामदेव आईलवाड आणि सुरेश राठोड यांच्या नावाची चर्चा आहे़ नांदेड शहरातील उत्तर आणि दक्षिण या दोन्ही मतदारसंघातून इच्छुकांची संख्या अधिक असल्याने रस्सीखेच सुरू आहे. 
 

Web Title: Maharashtra Assembly Election 2019 : many aspirant upset over Shivsena - BJP alliance possibility

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.