Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:46 IST2025-12-21T13:25:07+5:302025-12-21T13:46:28+5:30
एकाच कुटुंबातील तब्बल सहा उमेदवार मैदानात उतरवणाऱ्या भाजपचा धुव्वा उडाला

Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
- गोविंद कदम
लोहा : ‘घराणेशाही संपवू’ असा नारा देणाऱ्या भारतीय जनता पक्षालाच लोहा नगरपरिषद निवडणुकीत घराणेशाहीचा फटका बसला आहे. एकाच कुटुंबातील तब्बल सहा उमेदवार मैदानात उतरवणाऱ्या भाजपचा धुव्वा उडाला असून, या सर्व उमेदवारांचा पराभव झाला आहे.
आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपचा धुव्वा उडवत नगराध्यक्ष पदासह तब्बल १७ जागांवर विजय मिळवला आहे. तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला एक आणि काँग्रेसला एक अशी प्रत्येकी एकच जागा मिळाली आहे.
घराणेशाहीला दणका
नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून गजानन सूर्यवंशी हे उमेदवार होते. तर नगरसेवकपदासाठी त्यांची पत्नी गोदावरी सूर्यवंशी (प्रभाग ७ अ), भाऊ सचिन सूर्यवंशी (प्रभाग १ अ), भावजय सुप्रिया सूर्यवंशी (प्रभाग ८ अ), मेव्हणा युवराज वाघमारे (प्रभाग ७ ब) आणि भाच्याची पत्नी रीना व्यवहारे (प्रभाग ३) या सर्वांना भाजपने उमेदवारी दिली होती.मात्र, मतदारांनी या सर्व उमेदवारांना स्पष्ट नाकारले असून सहाहींचा पराभव झाला आहे. त्यामुळे भाजपच्या घराणेशाहीविरोधी भूमिकेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दिग्गजांच्या सभा तरी पराभव
निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री अतुल सावे यांच्या जाहीर सभा आणि खासदार अशोक चव्हाण यांच्या कॉर्नर बैठका घेऊनही भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. या पराभवामुळे लोहा नगरपरिषदेत भाजपचा प्रभाव कमी झाल्याचे स्पष्ट झाले असून, स्थानिक राजकारणात या निकालाने मोठी चर्चा रंगली आहे.