गळकं छप्पर, भिंतींना गेले तडे... नांदेडमध्ये जिल्हा परिषद शाळेतील दीड हजार वर्ग धोक्याचे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 12:47 IST2025-07-09T12:46:09+5:302025-07-09T12:47:20+5:30
शिक्षणाचं मंदिर की मृत्यूचा सापळा? दीड हजार वर्गखोल्या मोडकळीस; दुर्घटना घडल्यास जबाबदार कोण?

गळकं छप्पर, भिंतींना गेले तडे... नांदेडमध्ये जिल्हा परिषद शाळेतील दीड हजार वर्ग धोक्याचे
- अविनाश पाईकराव
नांदेड : जिल्ह्याच्या शिक्षणव्यवस्थेतील गंभीर वास्तव समोर आले आहे. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या १० हजार १५५ वर्ग खोल्या असून, त्यापैकी तब्बल १ हजार ४९८ वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. या धोकादायक स्थितीतच विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शिक्षण घ्यावे लागत आहे. या खोल्या कधी कोसळतील, याचा नेम राहिला नसल्याने या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
जिल्ह्यात जि.प.च्या २ हजार १९५ शाळा असून, १० हजार १५५ वर्गखाेल्यांची संख्या आहे. ज्यामध्ये जवळपास १ लाख ९६ हजार ३२५ विद्यार्थी सध्या ज्ञानार्जन करीत आहे. मात्र, यापैकी तब्बल १ हजार ४९८ वर्गखोल्यांची दयनीय अवस्था झाली आहे. छप्पर गळणे, भिंतींना तडे जाणे, प्लास्टर कोसळणे, तुटलेल्या खिडक्या आणि दरवाजांचे हाल झाले आहेत. पावसाळ्यात गळक्या छपरामुळे अनेक ठिकाणी वर्गात पाणी साचते आणि अशा स्थितीत विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणे अशक्य होते. काही ठिकाणी तर वर्गखोल्या इतक्या जीर्ण झाल्या आहेत की, कधीही मोठी दुर्घटना होईल याचा काही नेम नाही. अशा धोकादायक इमारतीमुळे अनेक ठिकाणी शिक्षकांना विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर बसवून शिकवावे लागत आहे. या धोकादायक वर्ग खोल्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवरही नकारात्मक परिणाम होत असून, असुरक्षित जागेमुळे विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागत नाही. सातत्याने डोक्यावर टांगती तलवार असल्याने त्यांच्या मनात भीतीचे सावट राहते. ही परिस्थिती विद्यार्थ्यांच्या मूलभूत शिक्षण हक्काचे उल्लंघन करणारी ठरत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची आणि त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची जबाबदारी शासनाची असून, याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांच्या जीवनाशी खेळण्यासारखे आहे. शासनाने या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन जीर्ण खोल्यांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.
भौतिक सोयी-सुविधांचीही वानवा
जि.प. शाळांकडे दुर्लक्ष होत असून, पाठपुरावा करूनही एक हजार २९७ नवीन वर्गखोली बांधकामांना मंजुरी देण्यात आली नाही. त्यामुळे या खोल्या आता मोडकळीस आल्या आहेत. याशिवाय सध्या जि.प. शाळांत ४ हजार ५६७ स्वच्छतागृह उपलब्ध असून, ७७८ नवीन स्वच्छतागृहाची आवश्यकता आहे. तसेच ७५५ स्वच्छतागृह वापरात नसल्याने त्याची दुरुस्तीदेखील होणे गरजेचे आहे. जि.प. शाळांत मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने याचा पटसंख्येवरदेखील परिणाम होत आहे.
प्रवेशोत्सवासाठी ढोल-ताशे, जीर्ण इमारतीचे काय?
जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सवाच्या नावाखाली ढोल-ताशे वाजले, पारंपरिक मिरवणुका काढल्या गेल्या, तर कुठे गावातून विद्यार्थ्यांची पारंपरिक बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. याचे पालकांनी कौतुक केले. मात्र, दुसरीकडे धोकादायक असलेल्या १ हजार ४९८ वर्गखोल्यांचे काय, असा सवालही पालकांनी केला आहे.