फक्त फोनवर सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:15 IST2021-05-17T04:15:44+5:302021-05-17T04:15:44+5:30
सातव यांच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात माझा विधानसभा मतदारसंघ येत असल्यामुळे अनेक विकासात्मक व सामाजिक विषयांसंदर्भात अगदी जवळून ...

फक्त फोनवर सर्वसामान्यांसाठी काम करणारा नेता
सातव यांच्या हिंगोली लोकसभा मतदारसंघात माझा विधानसभा मतदारसंघ येत असल्यामुळे अनेक विकासात्मक व सामाजिक विषयांसंदर्भात अगदी जवळून संपर्क आला. त्यामुळे त्यांची कार्यशैली, सामाजिक उत्तरदायित्व, प्रश्न घेऊन येणाऱ्यांसोबत संपर्क, जिव्हाळ्याचे संबंध व आपल्यापर्यंत आलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा व स्वत: खासदार असतानाही फोनवर सहज उपलब्ध होणे हा अनुभव घेता आला.
माझ्या मतदारसंघातील कुणाचेही काम असो त्यांना फक्त फोनवर संपर्क साधला की, मुंबईतील अथवा दिल्लीतील संबंधित कार्यालयात स्वतः जाऊन काम फत्ते करून काम झाल्याचं फोनवर सांगणार.
अगदी ग्रामीण सर्वसामान्य स्तरापासून पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, आमदार, खासदार ते आज राज्यसभा सदस्य या दिल्लीपर्यंतच्या स्तरापर्यंत त्यांनी उत्कृष्ट कार्य केले. युवक काँग्रेसचे साधे सदस्य ते राष्ट्रीय अध्यक्षापर्यंत मजल मारणारा हा एकमेव कार्यकर्ता. राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचा विश्वासू कार्यकर्ता म्हणून पक्षाने दिलेली कोणतीही जबाबदारी ते नेटाने पार पाडायचे. गुजरातचे प्रभारी म्हणून त्यांनी काँग्रेसला भरभरून यश मिळवून दिले.
असे खासदार राजीवजी सातव आज आपल्यासोबत नाहीत; परंतु यांच्यासोबतच्या काही अविस्मरणीय आठवणी कायम स्मरणात राहतील. खासदार राजीवजी सातव यांच्या स्मृतीस विनम्र आदरांजली. कालवश सातव यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच अपेक्षा.
- प्रदीप नाईक, माजी आमदार, किनवट माहूर