नांदेड : किडनीचे आजार असलेल्या व्यक्तींना अवयवदानाद्वारे मिळालेली किडनी ट्रान्स्प्लांट करण्यासाठी नांदेडात फक्त ग्लोबल हॉस्पिटल या ठिकाणी व्यवस्था आहे. डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मात्र ट्रान्स्प्लांटेशनचा सेटअपच नाही. आतापर्यंत ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आठजणांचे किडनी ट्रान्स्प्लांटेशन करण्यात आले आहे. यातील एक महिला ही ब्रेन डेड होती. कोरोना काळातही किडनी ट्रान्स्प्लांटेशन सुरूच होते हे विशेष.
धकाधकीच्या जीवनामुळे अनेकांना सध्या किडनीसंदर्भातील आजार होत आहेत, तर किडनी खराब झाल्याने डायलिसीसवर असलेल्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. त्यामुळे अशा रुग्णांवर किडनी ट्रान्स्प्लांटेशन शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी अगोदरच नोंदणी करावी लागते. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत अशाप्रकारची व्यवस्था नव्हती; परंतु आता नांदेडातही अशा शस्त्रक्रिया पार पाडण्यात येत आहेत. त्यासाठी मुंबई, हैदराबाद येथील तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेतली जात आहे. हे डॉक्टर नांदेडातील डॉक्टरांच्या मदतीने या ठिकाणी शस्त्रक्रिया करतात.
प्रत्यारोपणासाठी सर्जन कोठून येतात
नांदेडात यापूर्वी किडनी ट्रान्स्प्लांटेशनसाठी तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा होती. सर्वांत प्रथम ग्लोबल हॉस्पिटलने किडनी ट्रान्स्प्लांटेशनची व्यवस्था केली. त्यासाठी या ठिकाणी मुंबई, हैदराबाद आणि पुणे येथील तज्ज्ञ डॉक्टरांना पाचारण करण्यात आले होते. तसेच इतरही डॉक्टरांकडून ऑनलाईन मार्गदर्शन घेऊन किडनी ट्रान्स्प्लांटेशनच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्या. आतापर्यंत आठ शस्त्रक्रिया झाल्या असून, अजून वेगवेगळ्या रक्तगटाचे जवळपास २५ जण वेटिंगवर आहेत. त्यांच्यावरही लवरकच शस्त्रक्रिया होणार आहे.
किडनी ट्रान्स्प्लांटेशनसाठी रक्ताचे नाते अगोदर पाहिले जाते. घाटी रुग्णालयातील समिती रुग्ण आणि अवयवदान करणारा यांचे नाते तपासते. किडनी देणाऱ्याचे समुपदेशन केले जाते. सर्व बाबी पडताळून पाहिल्यानंतर किडनी ट्रान्स्प्लांटेशनसाठी परवानगी दिली जाते. अशाप्रकारे आतापर्यंत आठजणांवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या २५ जण वेटिंगवर आहेत. त्यामध्ये ए आणि ओ या रक्तगटाचे सर्वाधिक १८ जण आहेत, तर बी रक्तगटाचे ५ आणि एबी रक्तगटाच्या दोघांचा समावेश आहे. अवयवदान चळवळीला जिल्ह्यात मागील दिवसांत चांगलाच वेग आला आहे. त्यासाठी प्रशासनानेही मोहीम राबविली होती.