नांदेड जिल्ह्यात अपहृत चिमुरडीची हत्या; मृतदेह विहिरीत सापडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 06:00 IST2018-06-23T06:00:00+5:302018-06-23T06:00:00+5:30
नायगाव तालुक्यातील मांजरम येथील अपहृत सहा वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी गावाशेजारच्या विहीरीत सापडल्याने खळबळ उडाली.

नांदेड जिल्ह्यात अपहृत चिमुरडीची हत्या; मृतदेह विहिरीत सापडला
नरसीफाटा (जि. नांदेड) : नायगाव तालुक्यातील मांजरम येथील अपहृत सहा वर्षाच्या चिमुरडीचा मृतदेह शुक्रवारी सकाळी गावाशेजारच्या विहीरीत सापडल्याने खळबळ उडाली़ आरोपी श्रावण दशरथ गजभारे हा नातेवाईक असून तो पसार झाला आहे.
मांजरम येथील उत्तम पोणीराम वंजारे यांची सहा वर्षाची चिमुकली रितिका ही २० जून रोजी अंगणात खेळत असताना सायंकाळी सहाच्या सुमारास नातेवाईक आरोपी श्रावण दशरथ गजभारे याने मुलीचे बोट धरून तिला नेले़ दोन तास झाले तरी मुलगी परत आली नसल्याने आई वडिलांनी शोधाशोध सुरु केली. तेवढ्यात रितिकाला तिचा नातेवाईक घेवून जात असताना तिच्या चुलत भावाने पाहिले़ कळताच वडिलांनी श्रावणकडे विचारणा केली़ तेव्हा तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने नायगाव ठाणे गाठून वडिलांनी फिर्याद नोंदवली़ यावरून श्रावणविरूद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवण्यात आला़
गुन्हा नोंद झाला असला तरी आई वडिलांसह नातेवाईकांनी रितिकाचा शोध घेतला़ आरोपीवरही पाळत ठेवली़ मात्र चिमुरडी सापडण्याअगोरच श्रावण पसार झाला़ आरोपीसह मुलीचाही शोध सुरू असताना शुक्रवारी सकाळी मांजरमशेजारील एका विहिरीत चिमुरडीचा मृतदेह आढळला. या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल होईल, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांनी दिली़