अखेर नांदेडकरांसाठी नाथसागरच आला धावून; विष्णूपुरीत दिग्रस बंधाऱ्यातून पाणी पोहोचले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 06:40 PM2019-08-27T18:40:54+5:302019-08-27T18:44:27+5:30

नांदेडात जायकवाडीचे पाणी आले

Jayakwadi dam's water reached through Digras Dam in Vishnupuri | अखेर नांदेडकरांसाठी नाथसागरच आला धावून; विष्णूपुरीत दिग्रस बंधाऱ्यातून पाणी पोहोचले

अखेर नांदेडकरांसाठी नाथसागरच आला धावून; विष्णूपुरीत दिग्रस बंधाऱ्यातून पाणी पोहोचले

Next
ठळक मुद्दे‘जास्तीत जास्त पाणी घेण्याचा प्रयत्न’

नांदेड : अभूतपूर्व पाणीटंचाईने मागील ४ महिन्यांपासून तहानलेल्या नांदेडकरांना जायकवाडीतून आलेल्या पाण्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे़ पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्यातून सोमवारी सकाळी ६ वाजता सोडलेले पाणी १२ तासांत विष्णूपुरीत  पोहोचले आहे़ या पाण्यामुळे नांदेडकरांची तहान भागली जाणार आहे़

जायकवाडी धरण पहिल्यांदाच ९५ टक्के भरल्याने अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जात आहे़ संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवण्यासाठी गोदावरी नदीत असलेले १२ बंधारे जवळपास २५ टक्के भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ या निर्णयामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे़ याच निर्णयामुळे जायकवाडीचे पाणी २६ आॅगस्ट रोजी विष्णूपुरीत पोहोचले आहे़

सोमवारी सकाळी पालम तालुक्यातील दिग्रस बंधाऱ्यातून ३ हजार ५०० क्युसेक्स वेगाने गोदावरी पात्रात पाणी सोडण्यात आले़ हे पाणी सायंकाळी ६ वाजता विष्णूपुरी प्रकल्पात पोहोचले आहे़ हे पाणी सुरूच ठेवले जाणार आहे़ विष्णूपुरी प्रकल्पात आजघडीला १७़६६ दलघमी पाणी उपलब्ध आहे़ जवळपास २१़८६ टक्के पाणी होते़ दिग्रस बंधाऱ्यातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यामुळे विष्णूपुरीचा जलसाठा ५० टक्के होणार आहे़ त्यामुळे उपलब्ध झालेल्या पाण्यातून नांदेड शहराच्या पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करणे हे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला करावे लागणार आहे़ यामध्ये इतर विभागांची साथही महत्त्वाची ठरणार आहे़ त्यात महावितरणची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे़ महावितरणला २०१८ मध्ये आॅक्टोबरमध्ये अवैध पाणीउपसा रोखण्यासाठी विष्णूपुरी प्रकल्प परिसरातील विद्युतपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते़ मात्र त्याकडे महावितरणने कानाडोळाच केलाच़ याचा फटका शहरवासियांना बसला़ प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात झालेल्या अवैध पाणीउपशामुळे मेअखेर तर विष्णूपुरी मृतसाठ्यात पोहोचला़ सिद्धेश्वर धरणातील पाणी आणून नांदेडकरांची तहान कशीबशी भागविण्यात आली़ आजही शहराला आठ ते दहा दिवसांआड पाणी मिळत आहे.

‘जास्तीत जास्त पाणी घेण्याचा प्रयत्न’
नांदेड शहराला मागील सहा महिन्यांपासून टंचाईला तोंड द्यावे लागत आहे़ पावसाळ्याचेही जवळपास ३ महिने उलटले आहेत़ जिल्ह्यात सरासरीच्या ५० टक्केही पाऊस झाला नाही़ त्यामुळे आगामी काळातील नांदेडच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता जायकवाडीतून जास्तीत पाणी घेण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे जिल्हाधिकारी अरूण डोंगरे यांनी सांगितले़ जायकवाडीतील पाणी आल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Jayakwadi dam's water reached through Digras Dam in Vishnupuri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.