खवल्या मांजराची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 19:58 IST2020-06-23T19:58:28+5:302020-06-23T19:58:49+5:30
वन विभागाने सात आरोपींना घेतले ताब्यात

खवल्या मांजराची तस्करी करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद
बिलोली : शेजारील राज्यातून तस्करीच्या उद्देशाने घेवून जात असलेले दोन खवले मांजर वन विभागाच्या पथकाने बिलोली येथे छापा मारून ताब्यात घेतले. यावेळी तस्करी करणा-या सात आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.
वन्य प्राण्यामधील अनुसुची क्रं. एक मध्ये गणल्या जात आसलेल्या दुर्मिळ खवल्या मांजराची शेजारील राज्यातून निर्यात होत असल्याची माहिती वन विभागातील अधिका-यांना प्राप्त झाली असता. नांदेड येथील उप वन संरक्षण अधिकारी आशिष ठाकरे वडी. सहा वन संरक्षण अधिकारी डी.एस.पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बिलोली येथील देशमुख नगर येथील एका घरात छापा मारला असता दोन वर्ष वयाचे मादा जातीचे खवल्या मांजर व त्याचे सहा महिन्यांचे पिल्लू सापडले. यावेळी सात आरोपींसह एक दुचाकी वन विभागाच्या अधिका-यांनी ताब्यात घेतली आहे.
ही कारवाई भोकरचे आरएफओ आशिष हिवरे, इस्लापूरचे आरएफओ शिंदे, बोधडीचे आरएफओ श्रिकांत जाधव, हदगावचे आरएफओ रुद्रावार व देगलूर येथील आरएफओ एस.बी.कोळी यांनी कारवाई केली. दुर्मिळ जातीच्या मांजराची आंतर राज्यीय बाजार पेठेत मोठी किंमत असल्याची माहिती पुढे येत आहे. सदर प्रकरणातील सात आरोपी विरुद्ध वन्य जिव अधिनियम १९७२ नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बिलोली येथील वन विभाग कार्यालयात चालू आहे.