कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:18 IST2021-07-26T04:18:04+5:302021-07-26T04:18:04+5:30
नांदेड : राज्यामध्ये अनेक महामंडळांना सातवा वेतन लागू केलेला असताना सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या एसटी महामंडळास वाढत्या तोट्याचे कारण सांगून ...

कर्मचाऱ्यांमध्ये दुजाभाव, एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाची प्रतीक्षा
नांदेड : राज्यामध्ये अनेक महामंडळांना सातवा वेतन लागू केलेला असताना सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या एसटी महामंडळास वाढत्या तोट्याचे कारण सांगून आयोगापासून वंचित ठेवणे हे अन्यायकारक आहे. इतर राज्यांत राज्य परिवहन महामंडळाला वेतन आयोग लागू होत असतानाच महाराष्ट्रातच असा दुजाभाव का केला जातो, असा सवाल उपस्थित करत येणाऱ्या काळात संघटनेकडून या प्रश्नावर व्यापक लढा उभारला जाईल, असे प्रतिपादन कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केले. नांदेड येथे संघटनेच्या केंद्रीय उपाध्यक्षा शीला संजय नाईकवाडे यांच्या स्वेच्छानिवृत्तीनिमित्त आयोजित कार्यगौरव सोहळ्यात ते बोलत होते. मंचावर एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक विकास योगी, सीसीएसचे संचालक सूर्यवंशी, सीसीएस पतपेढीच्या संचालिका यमुना उकंडे हे उपस्थित होते. या वेळी शीला नाईकवाडे यांच्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कार्याचा आढावा घेणाऱ्या भावपूर्ण मानपत्राचे वाचन अध्यक्ष संदीप शिंदे यांनी केले.
कामगार चळवळीतील नेतृत्वाने सातत्याने कार्यरत असले पाहिजे व त्यासाठी सर्व कामगार बंधू व कुटुंबीयांनी अशा लढवय्या नेतृत्वास बळ दिले पाहिजे, असे आवाहन महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी केले.
या वेळी जयश्री जयस्वाल, नम्रता तरोडेकर, चंदा रावळकर, उज्ज्वला सदावर्ते, सुषमा गेहेरवार यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक विभागीय सचिव विनोद पांचाळ यांनी केले. सूत्रसंचालन नारायण नारेवार यांनी तर विभागीय अध्यक्ष एम.बी. बोर्डे यांनी आभार मानले.
यशस्वितेसाठी कामगार संघटनेचे मन्मथ स्वामी, चंद्रकांत पांचाळ, सारिपुत जाधव, आर.जी. सूर्यवंशी, माने, जी.पी. मोगले, आरती ओजलवार, सविता जमदाडे, पदमश्री राजे यांच्यासह विभागीय कार्यकारिणी, क्यु.आर.टी. टीम, निर्भया समिती यांनी प्रयत्न केले.
चौकट.........
हा स्वेच्छानिवृत्तीचा नव्हे तर ऊर्जादानाचा सोहळा - राजश्री पाटील
आई ही व्यक्ती अशी असते जी कधीच निवृत्त होत नसते. आज महाराष्ट्रात अनेक महिला कामगारांची आई झालेल्या शीलाताई यांनाही त्यामुळे कधीच निवृत्त होऊ दिले जाणार नाही, कारण आई कधीच रिटायर होत नसते. ती तिच्या जवळची ऊर्जा तिच्या लेकरांकडे सोपवीत असते. त्यामुळे आजचा हा सोहळा स्वेच्छानिवृत्तीचा नसून ऊर्जादानाचा सोहळा असल्याचे प्रतिपादन गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा राजश्री पाटील यांनी केले.