शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढले ऑनलाइनमुळे डोळ्यांचे आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:23 IST2020-12-30T04:23:59+5:302020-12-30T04:23:59+5:30

नांदेड : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक अंतर राखणे आवश्यक असल्याने शाळा-महाविद्यालये ठप्प झाली. ...

Increased eye disease among school children online | शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढले ऑनलाइनमुळे डोळ्यांचे आजार

शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाढले ऑनलाइनमुळे डोळ्यांचे आजार

नांदेड : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी शारीरिक अंतर राखणे आवश्यक असल्याने शाळा-महाविद्यालये ठप्प झाली. पर्यायाने विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाकडे वळले. मात्र, आता ऑनलाइन शिक्षणाचेही गंभीर दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. या शिक्षण पद्धतीमुळे मुले एकलकोंडे होत आहेत. याबरोबरच मानदुखी, पाठदुखीसह डोळ्यांच्याही तक्रारी वाढल्या असल्याने आता पालकांचीही चिंता वाढली आहे.

कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कॉम्प्युटर, पॅड, टॅबलेट, स्मार्ट फोन आदींच्या माध्यमातून मुले ऑनलाइन शिक्षणाकडे वळली आहेत. ही आधुनिक साधने हाताळण्याचे ज्ञान विद्यार्थ्यांना या पद्धतीमुळे प्राप्त झाले असले आणि या ज्ञानाचा हे विद्यार्थी वैयक्तिक जीवनातही वापर करू लागले असले तरी पाच ते सहा तास पुस्तक वाचल्यानंतर जेवढा डोळ्यावर ताण येतो, तेवढाच ताण एक तास मोबाइल पाहण्याने येतो, असे तज्ज्ञ डाॅक्टरांचे म्हणणे आहे. याचाच प्रत्यय आता येऊ लागला आहे. बालरोगतज्ज्ञांकडे मानदुखी, पाठदुखीबरोबरच डोळ्याच्या विविध विकारांचे बालरुग्ण वाढले आहेत. डोळे दुखणे, थकवा, चिडचिड अशा या विद्यार्थ्यांच्या तक्रारी असल्याचे बालरोगतज्ज्ञ डाॅ. हंसराज वैद्य यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाला पर्याय नसेल तर किमान त्याचा क्लास २० मिनिटांपेक्षा जास्त होणार नाही, याची दक्षता पालकांनी घ्यायला हवी, असेही ते म्हणाले.

ऑनलाइन शिक्षणाचे होणारे दुष्परिणाम

ऑनलाइन शिक्षणामुळे मानदुखी, पाठदुखीबरोबरच डोळ्यासंबंधीच्या तक्रारी वाढल्या आहेत. एवढेच नव्हे तर या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्याच्या एकाग्रतेवर परिणाम होत असून स्मरणशक्तीही कमी होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याबरोबरच मुले एकलकोंडी तसेच रागीट होत आहेत. चिडचिडेपणा वाढत आहे.

डोळेदुखीच्या तक्रारी वाढल्या

ऑनलाइन शिक्षणाचे अत्यंत वाईट परिणाम समोर येत आहेत. ही विद्यार्थ्यांबरोबरच पालकांसाठीही चिंतेची बाब आहे. मोबाइल, कॉम्प्युटर, टीव्हीपुढे जास्त वेळ ठराविक पोझिशनमध्ये बसल्याने विद्यार्थ्यांमधील इतर आजारही वाढत आहेत. याबरोबरच सावजनिक जीवनातूनही असे विद्यार्थी बाजूला पडत आहेत

-डॉ. हंसराज वैद्य, बालरोगतज्ज्ञ, नांदेड

दक्षता घेत आहोत; पण पर्याय काय?

मुलाचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या हेतूने ऑनलाइन शिक्षण देत आहोत. दुष्परिणाम पालक म्हणून आम्हालाही जाणवत आहेत. अभ्यासासाठी म्हणून मोबाइल दिल्यानंतर मुले व्हिडिओ गेम पाहतात. सततच्या डोळ्यासमोरच्या स्क्रीनमुळे डोळ्याला त्रास होईल याचीही चिंता सतावते; पण सध्यातरी दुसरा पर्याय नाही.

-गजानन वट्टमवार (पालक)

Web Title: Increased eye disease among school children online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.