‘अशोक चव्हाण सेवासेतू’चे आज उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:09 IST2021-02-05T06:09:20+5:302021-02-05T06:09:20+5:30
सोमवारी पत्रकार परिषदेत या उपक्रमाबाबत त्यांनी ही माहिती दिली. अ. भा. काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि कम्युनिकेशन्स विभागाचे प्रमुख रणदीपसिंग ...

‘अशोक चव्हाण सेवासेतू’चे आज उद्घाटन
सोमवारी पत्रकार परिषदेत या उपक्रमाबाबत त्यांनी ही माहिती दिली. अ. भा. काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि कम्युनिकेशन्स विभागाचे प्रमुख रणदीपसिंग सुरजेवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत २६ जानेवारी रोजी दुपारी ४ वाजता याचे ऑनलाइन उद्घाटन होणार आहे.
या उपक्रमाची मूळ संकल्पना कन्या श्रीजया यांनी मांडल्याचे चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले की, मुंबई व नांदेडच्या घरी, कार्यालयात, तसेच मंत्रालयात रोज मोठ्या संख्येने लोक निवेदने घेऊन येतात. त्यातील अनेक जण दूरवरून वेळ आणि पैसा खर्च करून आलेले असतात. अनेकदा त्यांच्या समस्या साधारण स्वरूपाच्या व एका दूरध्वनीद्वारे सुटण्यासारख्या असतात. अशा परिस्थितीत नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचावा, तसेच शासनाशी संबंधित त्यांची कामे लवकर व्हावीत, या हेतूने हे कॉल सेंटर सुरू करण्यात येत आहे.
‘अशोक चव्हाण सेवासेतू’चा दूरध्वनी क्रमांक ०२४६२-२२३००३ हा असून, सार्वजनिक सुटीचे दिवस वगळता सोमवार ते शनिवार सकाळी ११ ते ५ वाजेपर्यंत नागरिकांना या क्रमांकावर संपर्क साधून शासकीय कामकाजाबाबत आपली अडचण थेट अशोक चव्हाण यांच्यापर्यंत पोहोचवता येणे शक्य होणार आहे. प्रायोगिक स्तरावर तूर्तास ही सुविधा फक्त भोकर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी सुरू होत असून, भविष्यात हा उपक्रम संपूर्ण जिल्ह्यासाठी राबविण्याचा मानस असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. या कॉल सेंटरसाठी विशेष सॉफ्टवेअर बनवून घेण्यात आले आहे. नागरिकांच्या अडीअडचणी नोंदवून घेण्यासाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी १५ जणांचा चमू नियुक्त करण्यात आला आहे. ‘सेवासेतू’च्या कामकाजाचा दररोजचा अहवाल आपल्याकडे येणार आहे व मी स्वतः या यंत्रणेवर लक्ष देणार असल्याचे ते पुढे म्हणाले. पत्रकार परिषदेला आ. अमर राजूरकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, हनुमंतराव बेटमोगरेकर, काँग्रेसचे प्रवक्ते संतोष पांडागळे, मुंतजीब आदींची उपस्थिती होती.