अंध दाम्पत्याचा डोळस आधार काकानेच हिरावला; अपहरणानंतर केला चिमुकलीचा खून
By शिवराज बिचेवार | Updated: August 20, 2022 11:47 IST2022-08-20T11:46:02+5:302022-08-20T11:47:43+5:30
पोलिसांच्या चौकशीत चिमुकलीला तिच्या काकासोबत काही महिलांनी पाहिले होते.

अंध दाम्पत्याचा डोळस आधार काकानेच हिरावला; अपहरणानंतर केला चिमुकलीचा खून
नांदेड- शहरातील तेहरा नगर भागातील अंध दाम्पत्याचा डोळस आधार असलेल्या सहा वर्षीय चिमुकलीचे अपहरण केल्यानंतर तिचे प्रेत नदीत आढळून आले होते. या प्रकरणात पोलिसांनी मुलीच्या काकाला बेड्या ठोकल्या आहेत. काकाने या चिमुकलीचे अपहरण करून तिचा खून केल्याचे पुढे आले आहे.
रेल्वेत खाद्यपदार्थ विकणाऱ्या अंध दाम्पत्याचा सहा वर्षीय मुलगीच मोठा आधार होती. 13 ऑगस्ट रोजी घरासमोरून तिचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, पण ती सापडली नाही. शुक्रवारी गोदावरी नदी पात्रात तिचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांच्या चौकशीत त्या मुलीला तिच्या काकासोबत काही महिलांनी पाहिले होते, परंतु त्यानंतर तो पसार झाला होता. मयत मुलीच्या वडिलांनी ही तिच्या कानात असलेल्या दागिन्यांसाठी काकाने अपहरण केल्याचा संशय व्यक्त केला होता.
त्यानंतर शिवाजी नगर पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि माने, सपोनि शिवसांभ घेवारे यांनी शनिवारी रात्री शहरातील सहारा लॉज येथून आरोपी संतोष सखाराम हटेकर याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान शवविच्छेदन अहवालावरून आरोपीवर इतर गंभीर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.