अवैध दारू विक्री जोरात तळीरामांचा गोंधळ वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:13 IST2021-01-01T04:13:12+5:302021-01-01T04:13:12+5:30
माहूर : माहूर तालुक्यातील कुपटी, वानोळा, दत्तमांजरी, दहेगाव, इवळेश्वर, दिगडी (धा.), सिंदखेड, आष्टा परिसरात तळीरामांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली ...

अवैध दारू विक्री जोरात तळीरामांचा गोंधळ वाढला
माहूर : माहूर तालुक्यातील कुपटी, वानोळा, दत्तमांजरी, दहेगाव, इवळेश्वर, दिगडी (धा.), सिंदखेड, आष्टा परिसरात तळीरामांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून तळीराम गोंधळ घालत असल्याने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. परिसरात देशी-विदेशीसह हातभट्टी दारूची अवैधरित्या राजरोसपणे विक्री केली जात आहे. दारू कोठेही सहज मिळत असल्याने तरुणवर्ग व्यसनाधीन झाला आहे. दारू पिऊन अनेकजण सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालत असून, सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. सबंधितांनी याकडे लक्ष देऊन अवैध दारूविक्री बंद करावी, अशी मागणी परिसरातील महिलांनी केली आहे. मात्र, आजपर्यंत कोणतीही कारवाई झाली नसल्याने पोलीस प्रशासनाचे अभय मिळत असल्याचा आरोप महिलांनी केला आहे. पोलिसांचे अभय मिळत असल्याने अवैध दारू विक्रेत्यांची मोठी चलती आहे. कुणाला संशय येऊ नये म्हणून दारूविक्रेते लहान मुलांच्या माध्यमातून घरी दारू पोहोचवत असल्याचे विदारक चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. याकडे पोलीस प्रशासनाकडून डोळेझाक होत असल्याने संताप व्यक्त होत आहे. नांदेड पोलीस अधीक्षकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
पोलीस चौकीची गरज
माहूर तालुक्यातील वानोळा हे सर्कलचे ठिकाण असून, हा परिसर अतिदुर्गम भाग आहे. परिसरातील लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा वरिष्ठांकडे पोलीस चौकीची मागणी करून प्रस्तावही पाठवला. परंतु, अद्यापपर्यंत वरिष्ठ स्तरावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही.