चारित्र्याच्या संशयावरून त्रास देणाऱ्या पतीची विजेचा शॉक देऊन केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2019 14:21 IST2019-06-16T14:21:50+5:302019-06-16T14:21:57+5:30
चारित्र्यावर संशय घेऊन भीमरावाचा पत्नीसोबत वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले.

चारित्र्याच्या संशयावरून त्रास देणाऱ्या पतीची विजेचा शॉक देऊन केली हत्या
उमरी (जि.नांदेड ) : चारित्र्यावर संशय घेऊन सतत त्रास देत असल्याच्या कारणावरून पत्नीने विजेचा शॉक देऊन पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना तळेगाव ता. उमरी येथे घडली. भीमराव नागोराव हैबते (४२ ) असे मयत पतीचे नाव आहे. शनिवारी (दि.१५) रात्री १२:३० वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, भीमराव हैबते आपली पत्नी आम्रपाली आणि मुलांसोबत शनिवारी रात्री घरी होते . यावेळी चारित्र्यावर संशय घेऊन भीमरावाचा पत्नीसोबत वाद सुरू झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. दररोजच्या या प्रकाराने कंटाळून आम्रपालीने शेवटी पतीला संपविण्याचा निर्णय घेतला. घराबाहेरील पत्र्याच्या शेडमधील वायर तिने काढले. घरात येत भीमराव यास वीज प्रवाह चालू असलेल्या या वायरने शॉक दिला. यातच भिमरावचा अंत झाला. यानंतर सकाळी ही माहिती लपविण्यासाठी आम्रपालीने बनवाबनवी करून पोलिसांना चुकीची माहिती दिली. मात्र मयत भीमरावची बहीण जयशीला गौतम चव्हाण हिला घटनेबाबत संशय आल्याने तिने आज सकाळी उमरी पोलिसात तक्रार केली.
यावेळी पोलीस निरीक्षक उत्तम मुंडे यांनी घटनास्थळाची पाहणी करून सविस्तर माहिती घेतली . अगोदर आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला. त्यावरून ही घटना उघडकीस आली. पतीचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून आम्रपाली हिच्याविरुद्ध उमरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला व अटक केली आहे. पोलीस निरीक्षक उत्तम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सुदर्शन सुर्वे हे या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.