बालरोगतज्ज्ञांची फौज नसताना तिसरी लाट रोखणार कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:15 IST2021-05-29T04:15:06+5:302021-05-29T04:15:06+5:30
नांदेड : कोरोनाची तिसरी लाट ही बालकांसाठी अधिक धोकादायक असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे; परंतु शासकीय रुग्णालयांमध्ये मोजक्याच प्रमाणात ...

बालरोगतज्ज्ञांची फौज नसताना तिसरी लाट रोखणार कशी?
नांदेड : कोरोनाची तिसरी लाट ही बालकांसाठी अधिक धोकादायक असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे; परंतु शासकीय रुग्णालयांमध्ये मोजक्याच प्रमाणात बालरोगतज्ज्ञ आजघडीला कार्यरत आहेत. त्यामुळे बोटावर मोजण्याएवढ्या बालरोग तज्ज्ञांच्या भरवशावर तिसरी लाट रोखणार कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यावर आयएमएच्या शंभरहून अधिक बालरोगतज्ज्ञांची गरज पडल्यास मदत घेता येणार असल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. या लाटेत बालके अधिक प्रमाणात बाधित होण्याची शक्यता आहे; परंतु आजघडीला जिल्हा रुग्णालयात ३ आणि चार उपजिल्हा रुग्णालयात मिळून आठ बालरोगतज्ज्ञ आहेत. त्या तुलनेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात मात्र पूर्ण युनिट आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बालरोग तज्ज्ञांची कमतरता भासणार नाही; परंतु तिसऱ्या लाटेत अधिक जण बाधित झाल्यास मात्र उपलब्ध बालरोगतज्ज्ञांवर कामाचा ताण वाढणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आयएमएशी चर्चा करून त्यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. यापूर्वीच्या दोन लाटेत आयएमएच्या सदस्यांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले होते. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा चांगल्या प्रकारे मुकाबला करण्याचा विश्वास आरोग्य यंत्रणेने वर्तविला आहे.
कोरोनाची संभाव्य लाट बालकांवर परिणाम करणारी असल्याने त्यासंदर्भाने वैद्यकीय साधनांची जुळवाजुळव करणे आवश्यक आहे. बालकांसाठी वापरले जाणारे ऑक्सिजन सिलिंडर, मास्क, तसेच बालकांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असलेली औषधी मुबलक प्रमाणात असणे गरजेचे आहे. या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच बैठक घेतली होती. पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे स्वत: या बालरोग कक्ष उभारणीकडे लक्ष देऊन आहेत. प्रशासनाला ते सूचना देत आहेत. बालकांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून पालकांनीही आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे.
ग्रामीण भागातील स्थिती वाईट
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट अधिक तरुणांना अधिक घातक ठरली. त्यात आता तिसरी लाट बालकांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येते; परंतु नांदेड जिल्ह्यात आजही ग्रामीण भागात आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यातही बालरोगतज्ज्ञांची वानवा आहे. त्यामुळे उपचारासाठी त्यांना नांदेडलाच यावे लागते. प्राथमिक आरोग्य केंद्रे असूनही नावालाच आहेत. त्यामुळे याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.