हॉटेल बंदीने पोळ्या टाकणाऱ्या महिलांची भाजी-भाकरी थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:18 IST2021-04-09T04:18:28+5:302021-04-09T04:18:28+5:30
नांदेड जिल्ह्यात जवळपास साडेबाराशेहून अधिक हाॅटेल्स आहेत. त्यामध्ये सर्वाधिक शहरात साडेपाचशेच्या आसपास छोटी-हॉटेल्स, मेस, टिफीन सेंटरचा समावेश आहे. यातील ...

हॉटेल बंदीने पोळ्या टाकणाऱ्या महिलांची भाजी-भाकरी थांबली
नांदेड जिल्ह्यात जवळपास साडेबाराशेहून अधिक हाॅटेल्स आहेत. त्यामध्ये सर्वाधिक शहरात साडेपाचशेच्या आसपास छोटी-हॉटेल्स, मेस, टिफीन सेंटरचा समावेश आहे. यातील सर्वाधिक रोजगार देणाऱ्या मेस आणि हॉटेल्स बाबानगर, भाग्यनगर, टिळकरनगर, शामनगर आदी भागात होते. नांदेड शहरातील सदर व्यवसायांमुळे ग्रामीण भागातील तसेच शहरातील हजारो महिलांच्या हाताला काम लागले होते. परंतु, लाॅकडाऊन कालावधीत सर्वकाही बंद झाल्याने त्यांना घरी पाठविण्यात आले. आजघडीला घराचे भाडे, बचत गटाचे हप्ते, दवाखान्याचा खर्च आणि कुटुंबाचा उदनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे.
वर्ष कसे काढले आमचे आम्हालाच ठाऊक
मागील मार्च महिन्यात कोरोनामुळे लाॅकडाऊन झाला. त्यानंतर हॉटेल्स, मेस, टिफीन सेंटर आदी पूर्णपणे अद्याप सुरू झाले नाही. दरम्यान, नवीन वर्षाच्या प्रारंभापासून हळूहळू व्यवहार बरोबरच उद्योग रूळावर येऊ लागले होते. त्यात पुन्हा दुसऱ्या लाटेने कहर केला आहे. मागील वर्षभरात घरसंसार कसा चालवला हे आमचे आम्हालाच माहिती आहे. घरात खाणारे सहा ते आठ तोंड आणि कमवणारे सर्वच हात बंद झाले. त्यामुळे मेसमधील काम बंद झाल्याने भाजीपाला विक्री करूनही पाहिला. परंतु, त्यातही नुकसानच झाले.
मागील सहा वर्षांपासून पोळ्या टाकण्याचे काम करते. मागील वर्षात कोरोनामुळे काम सोडावे लागले. परिणामी घरातील कमवणारे हात कमी झाले. घरधनी दुकानावर काम करतात, त्यांचेही काम बंद झाले. त्यामुळे मागील वर्ष भयंकर अवघड गेले. दोन वेळच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाल्याने पुन्हा गावाकडे परतावे लागले. - शोभा नाईक
बाबानगर भागातील हाॅस्टेलवर काम करते. वर्षभरापासून हॉस्टेल बंद झाल्याने स्वयंपाकाचे कामही बंद झाले. त्यात ऑटो ही बंद राहिल्याने घरात येणारा पैसा बंद झाला. त्यामुळे लेकरांच्या शिक्षणावर ही परिणाम झाला. आजघडीला ५० टक्के पगारावर काम करावे लागत आहे. - जिजाबाई रहाटकर
पोळ्या टाकण्याचे काम बंद झाले, भीती पोटी घरकाम ही नाेकरी करणाऱ्या महिलाच करत आहेत. त्यातून त्यांना कामाची सवय होऊन गेली. परिणामी आता काम मिळणेही कठीण झाले आहे. पूर्वी एक घर सुटले तरी दुसरे घर लगेच मिळायचे परंतु, आता कमी पैशावर जास्त काम करावे लागत आहे. - मनिषा भगत