थकीत पगार काढण्यासाठी लाच घेताना मुख्याध्यापक अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2020 19:30 IST2020-09-02T19:29:09+5:302020-09-02T19:30:59+5:30
एका शिक्षकाचा जून २०२० या महिन्याचा पगार काढण्यासाठी मुख्याध्यापकाने मागितली लाच

थकीत पगार काढण्यासाठी लाच घेताना मुख्याध्यापक अटकेत
नांदेड : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाच्या पगाराचा धनादेश काढण्यासाठी ७ हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी मुख्याध्यापकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली. पुंडलिक टोके असे अटकेतील मुख्याध्यापकाचे नाव आहे. मुखेड तालुक्यातील पाळा येथील केंद्रीय प्राथमिक शाळेचे ही कारवाई मंगळवारी करण्यात आली़
मुखेड तालुक्यातील पाळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या एका सहकाऱ्याचा जून २०२० या महिन्याचा पगार काढण्यासाठी मुख्याध्यापकाकडून ७ हजार रुपयांची लाच मागण्यात आली़ या प्रकरणी शिक्षकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती़ त्यानुसार सापळा रचून ७ हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या केंद्रीय मुख्याध्यापक पुंडलिक रामजी टोके यांना साडेतीन हजार रुपये मिळविण्याच्या प्रयत्नात असताना अटक केली आहे़
त्याचबरोबर सात हजारापैकी साडेतीन हजार रुपये टोके यांनी यापूर्वीच घेतले होते़ सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शेषेराव नितनवरे, पो़ना़हणमंत बोरकर, किशन चिंतोरे, गणेश केजकर, अमरजीतसिंह चौधरी, शेख मुजीब यांच्या पथकाने ही कारवाई केली़ या प्रकरणी देगलूर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़