दोन-तीन तासच झोपायचा; ‘अदालत’ वेबसिरीज पाहून रचला खुनाचा कट
By शिवराज बिचेवार | Updated: December 12, 2024 20:13 IST2024-12-12T20:12:39+5:302024-12-12T20:13:05+5:30
मयताच्या नातेवाइकांना दुसऱ्यावरच होता संशय; गावातील मंडळींकडून माहिती काढण्यासाठी पोलिसांनी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना साध्या वेशात गावात तैनात केले होते.

दोन-तीन तासच झोपायचा; ‘अदालत’ वेबसिरीज पाहून रचला खुनाचा कट
नांदेड : वाका येथे ४ डिसेंबरच्या पहाटे किशन खोसे या वृद्धाचा खून करण्यात आला होता. अत्यंत क्लिष्ट आणि गुंतागुंतीच्या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा करून मदन हंबर्डे याला बेड्या ठोकल्या. बुधवारी न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिसकोठडी सुनावली. आरोपी मदन याने अदालत नावाची गुन्हेगारीविषयक वेबसिरीज पाहून खोसे यांच्या खुनाचा कट रचला होता. परंतु, मयताच्या नातेवाइकांचा मात्र दुसऱ्यावरच संशय होता. त्यातून त्यांनी अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली होती. परंतु, पोलिस मात्र आपल्या भूमिकेवर ठाम होते. त्यामुळेच या प्रकरणात खरा मारेकरी सापडला.
मुलाची हत्या, विवाहितेची आत्महत्या अशी पार्श्वभूमी किशन खोसे यांच्या हत्येला होती. त्यामुळे पोलिसांनी सर्वच बाजूंनी तपास सुरू केला होता. घटनेच्या दिवशी पहाटेची वेळ असल्यामुळे प्रत्यक्षदर्शी कुणीच नव्हता, तर किशन खोसे यांच्या मुलाच्या हत्येत तुरुंगात जाऊन पुन्हा बाहेर आलेला आनंदा हंबर्डे हाही गावातच होता. त्यामुळे पोलिसही बुचकाळ्यात पडले होते. त्यातच मयताच्या कुटुंबीयांनी आनंदा हंबर्डे याच्यावर संशय व्यक्त केला होता. त्याला जोपर्यंत अटक केली जात नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका घेतली होती. परंतु, पोलिस आपल्या भूमिकेवर ठाम होते. घटनेच्या दुसऱ्याच दिवसापासून पोलिसांना मदन हंबर्डे याच्यावर संशय होता. परंतु, सर्व पुरावे हाती लागत नाहीत तोपर्यंत मदनला हात घालायचा नाही, अशी योजना आखण्यात आली होती. त्याच्या नकळत पोलिस त्याच्या सर्व हालचालींवर लक्ष ठेवून होते. गावात मदनही नेहमी वावरतो, तसा वावरत होता. अनेकवेळा पोलिस काय चर्चा करतात? याचा कानोसा घेत होता.
पोलिसांनीही त्याची खडानखडा माहिती मिळविली. त्यात मदन हंबर्डे हा अदालत नावाची गुन्हेगारीविषयक वेबसिरीज पाहात असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. गोपनीय बातमीदाराकडूनही त्याच्याबद्दल अधिकची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पुरावे गोळा केले अन् मदनला उचलले. आता न्यायालयाने मदन हंबर्डेची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. याप्रकरणात पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार, अपर पोलिस अधीक्षक सुरज गुरव, पोनि. उदय खंडेराय, सपोनि. चंद्रकांत पवार, पोउपनि. आनंद बिचेवार यांनी वाका गावात तळ ठोकून तपासाची चक्रे हलविली. गावातील अनेकांची चौकशी केली. सायबर तज्ज्ञांचीही मदत घेण्यात आली. अशा प्रकारे किचकट खून प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले.
आरोपीची दोन ते तीन तासच झोप
आरोपी मदन हंबर्डे याचे पाच वर्षांपूर्वी घरातील मंडळींसोबत भांडण झाले होते. त्यामुळे तो घरी जात नव्हता. दुकानात किंवा शेतातच झोपत होता. त्यात त्याची झोपही केवळ दोन ते तीन तासांचीच होती. उर्वरित वेळेत तो मोबाइलवर अदालत नावाची वेबसिरीज पाहायचा. या वेबसिरीजमध्ये गुन्हे कसे घडतात? पोलिसांचा तपास? शिक्षा? सुटायचे कसे? याबाबत त्याने माहिती मिळविली होती. फक्त सण - उत्सव किंवा पाहुणे मंडळी आल्यास तो घरी जायचा. गावातही त्याचे फारसे कुणाशी जमत नव्हते.
महिला कर्मचाऱ्यांनी केले सर्वेक्षण
गावातील मंडळींकडून माहिती काढण्यासाठी पोलिसांनी महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांना साध्या वेशात गावात तैनात केले होते. महिला कर्मचारी वेश बदलून घरोघरी जाऊन शासकीय योजनांचे सर्वेक्षण करण्याच्या नावाखाली महिलांकडून काही माहिती मिळते का? याची चाचपणी करीत होत्या, तर पुरुष कर्मचारी शेतकऱ्यांच्या वेशात गावातील हॉटेल, कट्टे तसेच शेतात जाऊन काम करणाऱ्या मंडळींकडून माहिती घेत होते.