मराठा आंदोलकांचा गनिमीकावा; लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात लढणार हजारो उमेदवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 06:46 PM2024-03-01T18:46:09+5:302024-03-01T18:46:59+5:30

राज्यभरातील सर्व लोकसभा मतदार संघात देखील मराठा आंदोलक हजारो उमेदवार देणार आहेत 

Guerrillary of Maratha agitators; Thousands of candidates will fight against Modi in the Lok Sabha elections | मराठा आंदोलकांचा गनिमीकावा; लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात लढणार हजारो उमेदवार

मराठा आंदोलकांचा गनिमीकावा; लोकसभा निवडणुकीत मोदींच्या विरोधात लढणार हजारो उमेदवार

 - गोविंद टेकाळे 
अर्धापूर (जिल्हा नांदेड) :
मागील कांही महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचे आंदोलन वेगवेगळ्या प्रकाराने चर्चेत येत असून  मराठा आरक्षणावरून शासनाने समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप मराठा समाजाकडून होत आहे. त्यातच शासनाने मराठा यौध्दा मनोज जरांगे पाटील यांची एस.आय. टी. मार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिल्याने मराठा आंदोलक संतप्त झाले. त्यामुळे आता रस्त्यावरच्या लढाईबरोबर गनिमी कावा करण्याची तयारी मराठा समाजाने चालविली आहे. याच अनुषंगाने आगामी लोकसभा निवडणूकीत राज्यभरातून मराठा समाज प्रत्येक लोकसभा मतदार संघात किमान एक हजार उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अर्धापूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे. 

राज्यातील मराठा समाजाला ओ.बी.सी. प्रवर्गामधून आरक्षण आणि ' सगेसोयरे ' च्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचा लढा सुरूच आहे. त्यांच्या या लढ्याला मराठा समाजाची देखील साथ मिळत आहे. याच मागणीसाठी सकल मराठा समाजा कडून रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले. मात्र शासनाकडून कुठलीच दखल घेतली जातं नाही. उलट जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या चौकशीसाठी एस.आय.टी. लावण्याचे निर्देश शासनाने दिले आहे. त्यामुळे मराठा समाजामध्ये शासना विरोधात नाराजी पसरली आहे. तेंव्हा रस्त्यावरील आंदोलना सोबतच गमिनीकावा करण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सकल मराठा समाजाने केली आहे. 

प्रत्येक गावातून दहा उमेदवार असे एकूण नांदेड जिल्ह्यात एक हजार उमेदवार निवडणूकीच्या रिंगण्यात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत दि.२९ फेब्रुवारी गुरूवार रोजी सायंकाळी अर्धापूर तालुक्यात मराठा समाजाची बैठक देखील पार पडली आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात नांदेड जिल्ह्यातून एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी शेकडोंच्या संख्येने मराठा समाजातील कार्यकर्ते उपस्थित होते. मराठा समाजाच्या या निर्णयामुळे येणारी निवडणुक सर्वच पक्षासाठी आव्हानात्मक असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

निवडणूक विभागाची होणार दमछाक
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदार संघात एक हजार उमेदवार उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने निवडणूक विभाग आणि प्रशासनाची चांगलीच दमछाक होणार असून एका कंट्रोल युनिटवर २४ बॅलेट युनिट लावता येतात. १ बॅलेट युनिटवर १६ उमेदवारांच्या चिन्हांची बटणे असतात. एकूण २४ युनिटवर ३८४ उमेदवारांच्या निवडणूक चिन्हांचा समावेश व 'ईव्हीएम' ची क्षमता असते. जर ३८४ पेक्षा जास्त उमेदवार झाले तर मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याशिवाय निवडणूक आयोगासमोर पर्याय नसतो. त्यामुळे शासनाला अडचणीत आणण्यासाठी राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदारसंघात एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करून मराठा समाज गनिमी कावा करणार आहे. जर असे झाले तर मात्र निवडणुक विभागाची मोठी दमछाक होणार आहे.

Web Title: Guerrillary of Maratha agitators; Thousands of candidates will fight against Modi in the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.